बलाढ्य स्पेन स्पर्धेबाहेर

0
74

अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये यजमान रशियाने स्पेनचा ४-३ असा पराभव करत धक्का दिला. सामन्यातील या विजयामुळे रशियाने उपांत्यपूर्व ङ्गेरीत प्रवेश केला आहे. सर्जेई इग्नाशेविच याच्या स्वयंगोलामुळे १२व्या मिनिटाला स्पेनने आघाडी घेतली तर ४१व्या मिनिटाला झ्युबा याने पेनल्टी सत्कारणी लावत रशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने १५-१५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आली. या वेळेतही कोंडी न सुटल्याने अखेरीस पेनल्टीचा अवलंब करावा लागला. संपूर्ण सामन्यावर स्पेनने वर्चस्व राखताना ७४ टक्के वेळेत चेंडूवर ताबा राखताना गोल करण्याचे २५ प्रयत्न केले. पेनल्टीच्या वेळी रशियाचा गोलरक्षक इगोर अकिनफीव याने स्पेनच्या कोके व अस्पास यांचे फटके अडविले.

स्पेनकडून आंद्रेस इनिएस्टा याने पहिली पेनल्टी यशस्वी करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. फ्योदोर स्मोलोव याने यानंतर रशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. गेरार्ड पिक्वे याने स्पेनच्या दुसरी पेनल्टीवर गोल केला. रशियाच्या सर्जेई इग्नाशेविच याने गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. स्पेनच्या कोकेने यानंतर संधी दवडली. आलेक्झांडर गोलोविनने गोल करत रशियाला ३-२ असे आघाडीवर नेले. सर्जियो रामोसने यानंतर स्पेनची पिछाडी भरून काढत संघाला ३-३ अशा स्थितीत आणले. रशियाच्या डेनिस चेरिशेव याने प्रचंड दबावाखाली चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवत रशियाला ४-३ असे आघाडीवर नेले. इयागो अस्पास याला गोल नोंदविण्यात अपयश आल्याने रशियाने जल्लोष करत विजय साजरा केला. स्वोव्हिएत रशियाचे विभाजन झाल्यानंतर विश्‍वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची रशियाची ही पहिलीच वेळ ठरली आहे.