‘बर्जर पेंट’मधील आगीच्या घटनेला कंपनीच जबाबदार

0
5

कारखाने आणि बाष्पक खात्याचा अहवाल

पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर पेंट या कंपनीतील कामगारांना आग विझविण्याचे प्राथमिक प्रशिक्षण नसल्याने आग छोट्या प्रमाणात असताना नियंत्रणात आणण्यात यश आले नाही. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आगीवर वेळीच नियंत्रण आणले असते, तर मोठी दुर्घटना टळली असती. अतिधोकादायक रसायनाचा वापर करणाऱ्या कंपनीतील कामगारांना आग विझविण्याचे प्राथमिक प्रशिक्षण न देणे कायद्याचे उल्लंघन आहे, असे कारखाने आणि बाष्पक खात्याने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील अपघातबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

पिळर्ण येथील या बर्जर कंपनीला 10 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास आग लागली होती. या आगीत कंपनीचे सुमारे 60 ते 70 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या आगीमुळे धूर प्रदूषणाची समस्या निर्माण झाली होती. या कंपनीला लागलेली आग चार दिवसानंतर आटोक्यात आली होती. या कंपनीला लागलेल्या आगीचे कारण कारखाने आणि बाष्पक खात्याच्या अहवालात स्पष्ट झालेले नाही. तथापि, कंपनीत लागलेली आग वेळीच आटोक्यात आणण्याचे प्राथमिक प्रशिक्षण कामगाराला देण्यात आले असते, तर आग वेळीच आटोक्यात आणली जाऊ शकली असती. अतिधोकादायक कंपनीतील कामगारांना आग विझविण्याचे प्रशिक्षण न देणे हे कारखाने आणि बाष्पक कायद्याचे उल्लंघन आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.