– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
माझी ‘भंगार’ नावाची एक कविता आहे ती अशी :
गणू माझा वर्गमित्र
शाळा सुटली; घरी पाटी – पुस्तके
ठेवली
की तो अर्ध्या चड्डीत धाव मारायचा
भंगार गोळा करायचा.
रविवार तर त्याचा खास
भंगार गोळा करायचा दिवस
त्या पैशांनी मग वही, पेन्सिल
जुनी पुस्तके खरेदी करायचा
दोन पैसे उरलेच तर
चणे, कुरमुरे खायचा
आज गणू भंगाराचा मालक झालाय
हातात पैसा आला तसा
घर, जमीन, गाडी सगळे घेतले
…… आणि एक दिवस
बेकायदा भंगार अड्ड्यावर छापा
पडला
भंगारातील सामान जप्त होताना पाहून
गणूच्या जीवाचा अंगार झाला…
ही फक्त कविकल्पना नव्हे. तो वर्गमित्र मग गणू, शाणू, राणू कुणीही असू शकतो. पण शून्यातून वर येऊन मग आपल्या धंद्याला प्रतिष्ठा मिळावी, तो कायदेशीर व्हावा असे मात्र होत नाही आणि मग भंगारवर गब्बर झालेल्यांचा धाड पडल्यावर अंगार होतो, तो गणूसारखा!
सध्या चालू असलेल्या विधानसभेत लोकांना सतावत असलेल्या ‘भंगार’ विषयाकडे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य प्रहरावेळी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी डॉ. सावंत यांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे. ते म्हणाले,‘बेतोडा आणि कोडार येथे अशा भंगार अड्ड्यांचा उच्छाद सुरू असून अशा अड्ड्यांमुळे लोकांना त्रास होत आहे. कारण काही भंगारअड्डे चक्क वीज वाहिन्यांच्या खाली उभे आहेत आणि ते धोकादायक ठरू शकतात.’ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी तितक्याच तत्परतेने या भंगार अड्ड्यांची दखल घेत सभागृहाला ६० दिवसांत भंगारअड्डे हटविण्याबाबत कारवाई करू असे आश्वासन दिले. याबाबत त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘वीज वाहिन्यांसाठी किंवा अन्य प्रकारे जिवीताला धोकादायक आणि सार्वजनिक मालमत्तेला धोकादायक ठरू शकतील असे सर्व भंगारअड्डे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना जारी केले जातील.’
भंगार अड्ड्यांच्या संदर्भात गत विधानसभेत थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांनी म्हापसा शहरातील करासवाडा ते कोलवाळ पंचायत हद्दीत पसरलेल्या अनधिकृत भंगार अड्ड्यांबाबत आवाज उठविला होता. मग झोपेतून जाग आलेले सरकारी अधिकारी जागे झाले व तत्परतेने अनधिकृत भंगारअड्डे युद्धपातळीवर हटवण्याचे काम हाती घेतले होते. या कारवाईमुळे दुखावले गेलेले भंगारअड्ड्यांचे मालक मग गोळा झाले आणि त्यांच्या भंगार अड्डे व्यापारी संघटनेने म्हापशात मोठा मोर्चा काढून सरकारला सांगितले की, ‘सरकारने भंगार अड्ड्यांना जागा निश्चित करून द्यावी व मगच भंगार अड्ड्यांवर छापा मारावा.’ या संघटनेचे अध्यक्ष व सरचिटणीस मेहमूद खान आणि सय्यद अब्दुल अझिज यांनी ही मागणी केली होती.
उत्तर गोव्यात सुमारे दोनशे भंगार अड्ड्यांचे मालक आहेत. त्यांना कायदेशीर जागा निश्चित करून त्याबाबत योग्य तो मोबदला त्यांच्याकडून वसूल करता येईल. पण हे भंगार अड्डे अर्थातच शहराच्या बाहेर आणि लोकवस्तीपासून दूर असणे मात्र आवश्यक आहे.
म्हापशातील भंगार अड्ड्यांच्या बाबत सांगायचे झाले, तर महामार्गालगतची मोक्याची जागा या व्यापार्यांनी बळकावलेली आहे. या भंगारअड्ड्यांमध्ये रसायनाचे साठेही असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा अड्ड्यांना जर रात्री-अपरात्री आग लागली तर काय दुर्धर प्रसंग ओढवेल, याची कल्पनासुद्धा करवत नाही!
या भंगारामध्ये सुरुवातीपासून बाहेरची माणसे कार्यरत असून गोव्याच्या म्हापसा, पणजी, डिचोली, मडगाव, वास्को व फोंडा या प्रमुख शहरांबरोबरच काही पंचायत परिसरातही त्यांचा माल साठवलेला आढळतो. या सर्वांसाठी गोव्याच्या औद्योगिक वसाहतीची जागा त्यांना द्यावी, असा सूरही मध्यंतरी आळवला गेला होता. पण तेथील उद्योजकांकडून त्याला तीव्र विरोध झाला होता. त्यांचे म्हणणे असे की, ‘भंगार अड्ड्यांच्या निमित्ताने औद्योगिक वसाहतीत अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांना मग सुरुवात होईल. त्यांचे हे म्हणणे गैर आहे, असे म्हणता येणार नाही.
गोव्यात कचरा, प्रदूषण आणि भंगारअड्ड्यांचा प्रश्न गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. अनेकवेळा विधानसभेतही यावर आवाज उठवला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी भंगारअड्ड्यांचा विषय यावेळी अधिक गंभीरपणे घेतल्यामुळे व ६० दिवस हा भंगारअड्डे हटवण्याचा ‘टाईम’ बाऊंड’ कार्यक्रम ठरविल्यामुळे लोकांत हा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे, त्याला तडा जाता कामा नये. ६० दिवसांत हटवले गेलेले भंगारअड्डे पुनरुपी ६० दिवसांत तेथे विराजमान होणार नाहीत, याचीही दखल संबंधित यंत्रणेला द्यावी लागेल. तेथे मुंबई महानगरपालिकेत मोठमोठ्यांची खैर न करता गो. रा. खैरनार या अधिकार्याने कसे हातोड्याचे घाव घालून आपली कार्यक्षमता दाखवून दिली होती याची आठवण होते.
अनधिकृत व बेकायदेशीर छोट्या-मोठ्या व्यापार्यांची बांधकामे जमीनदोस्त करताना खैरनार यांनी कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्या इमारतींवरही घणाघाती घाव घालून आपले कार्य चोख बजावले होते. अर्थात यासाठी सरकारी अधिकार्यांना सत्ताधार्यांचेही पाठबळ मिळाले, तर इप्सित साध्य होऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे ‘जहॉं चाह, वहॉं राह’ म्हणजे इच्छा तेथे मार्ग असे आपण म्हणतो. मुख्यमंत्र्यांनी भंगारअड्डे हटवण्याची इच्छा प्रकट केली आहे, त्याला सर्व थरांतून सहकार्याच्या हाताची गरज आहे. त्यांचबरोबर भंगारअड्ड्यांवर पोट भरणार्यांना योग्य तो कर बसवून लोकवस्तीतून दूर जागा भंगारअड्ड्यांसाठी देऊन त्यांचाही प्रश्न सोडवला गेला पाहिजे.