बमध्ये महिलेशी गैरवर्तन प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याची गच्छंती

0
10

कळंगुट येथील एका पबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणे आयपीएस अधिकारी डॉ. ए. कोन यांना महागात पडले आहे. त्यांना काल पोलीस उपमहानिरीक्षक पदावरून हटविण्यात आले. त्यांना पोलीस महासंचालकांना रिपोर्ट करण्याचा आदेश काल देण्यात आला. तसेच त्यांच्याकडे असलेल्या पदाचा ताबा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. डॉ. कोन याची फेब्रुवारी 2023 मध्ये गोव्यात नियुक्ती करण्यात आली होती.
कळंगुटमध्ये एका पबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सकाळी विधानसभेत दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली.

गोवा विधानसभेचे बुधवारी सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याकडून महिलेशी गैरवर्तन करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आयपीएस अधिकाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलेशी गैरवर्तन प्रकरणामध्ये गुंतलेल्या पोलीस आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करून या प्रकरणी कसून चौकशीची मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली. आपल्या नजरेस आलेले आयपीएस अधिकाऱ्याचे हे दुसरे प्रकरण आहे. सर्वच आयपीएस अधिकारी वाईट नाहीत. पोलीस खात्यात चांगले आयपीएस अधिकारी आहेत, असेही लोबो यांनी सांगितले.