बनावट कॉल सेंटरद्वारे फसवणूक

0
6

>> माजोर्डा येथे 9 जणांना अटक, 15 लाखांचे साहित्य जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दक्षिण गोव्यातील माजोर्डा येथील अडावाडो-किरभाट येथे एका हॉलिडे होममध्ये बनावट कॉल सेंटर सुरू करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 9 जणांना अटक करून 15 लाखांचे साहित्य जप्त केले.

पोलिसांनी अटक केलेले सर्वजण परप्रांतीय असून माजोर्डात येथील कॉल सेेंटरच्या माध्यमातून अमेरिकेच्या नागरिकांची लुबाडणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी विनय माखवान (32 वर्षे, अहमदाबाद गुजरात), घाची अल्फारझ (28 वर्षे, गुजरात), आकाश बिस्वास (23, शिलाँग, मेघालय), आकाश सुनार (23, मेघालय), केसंग तमंग (22, प. बंगाल), राहूल सरसार (29, मुंबई), अजय बिस्वास (25, मेघालय), तन्मय दासगुप्ता (20, नागालँड) व रेहान शेख (27, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 9 लॅपटॉप, 9 राऊटर, 2 मॉडेम, 9 मोबाइल फोन, हेडफोन, सर्व ॲक्सेसरीज केबल्स आणि 65 हजारांची रोकड मिळून 15 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संशयितांनी एक्स-लाईट नावाच्या ॲपवरून व्हीपीएनचा वापर करून अमेरिकेतील नागरिकांचा डाटा मिळवला. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाला कॉल करून ते युनायटेड स्टेटच्या बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना फसविण्यास सुरूवात केली. क्रेडिट स्कोअर कमी असल्याने दंड भरा, असे सांगून गुगल पेद्वारे पैसे भरण्याची सूचना केली जात होती. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचे भारतीय चलनात रूपांतरण करून घेत असत.