बनावट कागदपत्रांद्वारे हडपलेल्या जमिनींची मंत्र्याकडूनच विक्री

0
16

>> आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचा गंभीर आरोप

राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करण्यात आलेल्या जमिनी विकण्याचे काम राज्य सरकारमधील एक मंत्री करीत आहे. भाजपच्या काही आमदारांनी आसगाव परिसरात मालमत्ता विकत घेतल्या आहेत, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केला असून याबाबत आपल्याकडे पुरावे असून योग्य वेळी उघड केले जाणार आहेत, असेही पालेकर यांनी काल आपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज्य सरकारने राज्यातील हडप केलेल्या जमिनींंची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीने जमीन हडप प्रकरणांबाबत आपला अहवाल सादर केला असला तरी देखील तो सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. राज्यातील जमीन हडप प्रकरणात चार ते पाच मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर हडप करण्यात आलेल्या जमिनी विकण्याचे काम सुरू झाल्याची आम्हांला मिळाली आहे. ज्यांच्या जमिनी हडपल्या गेल्या त्यांना एसआयटीमुळे न्याय मिळणे अपेक्षित होते. मात्र इथे उलटे होत आहे. एसआयटीच्या नावाखाली काही जमीन मालकांकडून पैसे उकळले जात आहेत. ज्यांचे वारस नाहीत अशांच्या जमिनी सरकारला कशाला हव्या आहेत याचे उत्तर द्यावे, असेही ॲड. पालेकर यांनी सांगितले.

विधानसभा पावसाळी अधिवेशनात सरकारने विविध विधेयके आणून गोव्याला रिअल इस्टेट लॉबीला विकण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीबी किंवा अन्य विधेयकांमुळे सामान्य गोवेकरांना कोणताही फायदा होणार नाही. विरोधी पक्षातील सात आमदाराच्या प्रभावी कामगिरीमुळे काही सरकारी विधेयक मागे घ्यावी लागली. तर, काही विधेयके चिकित्सा समितीकडे पाठवावी लागली. आपच्या दोन्ही आमदारांनी पावसाळी अधिवेशनात चांगली कामगिरी करून लोकांचे प्रश्न मांडले आहेत.
आपच्या दोन्ही आमदारांनी विधानसभेत भाजप सरकारचे अपयश उघड केले. त्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे उत्तर नव्हते. त्यामुळेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली. भाजप सरकार आपच्या प्रभावी नेतृत्वाला किती घाबरले आहेत हे लक्षात येते, असे आपचे कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. यावेळी आपचे नेते जेर्सन गोम्स यांची उपस्थिती होती.