>> बेकायदा व्यवहारांत गुंतलेल्यांचे धाबे दणाणले; तक्रारी नोंदवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री आणि जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने प्रथमच विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. एसआयटीकडून या जमीन विक्री आणि जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणांचा तपास होणार असल्याने त्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
यासंबंधीचा आदेश अवर सचिव (गृह) गिरीश सावंत यांनी काल जारी केला. या विशेष तपास पथकामध्ये गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक निधीन वाल्सन (आयपीएस) यांच्यासह उपजिल्हाधिकारी (दक्षिण गोवा) स्नेहल प्रभू, पोलीस उपअधीक्षक ब्राझ मिनेझिस, पोलीस निरीक्षक सतीश गावडे, पोलीस निरीक्षक (आयआरबी) नीलेश शिरोडकर, तसेच निबंधक कार्यालय आणि पुरातत्त्व खात्याच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
गोव्याची भूमी आणि राज्याचे हित जपण्यासाठी आम्ही कोणताही कसर सोडणार नाही. राज्यात बेकायदेशीर जमीन हस्तांतरणाची काही प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणात त्वरित कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी बेकायदा जमीन हडपणेविषयक आणि हस्तांतरण प्रकरणाच्या तक्रारींसाठी एसआयटीकडे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.