बदललंय आता सारंच! 

0
231
सरिता नाईक
 (फातोर्डा, मडगाव )
तेव्हा कल्पेनतही खर्‍या न वाटणार्‍या घटना आज घडत आहेत.
मोलकरीण बाईही आता घरोघरी पोहोचली आहे. काही वर्षांमागे मळके, जुने कपडे घालून येणारी, मालक लोकांशी दबून असणारी, मोजून-मापून नम्रतेने बोलणारी, वागणारी मोलकरीण आता दिसत नाही. 
हायस्कूलमध्ये असताना भूगोलाच्या पुस्तकात मी ऑस्ट्रेलियामध्ये घोड्यावरुन शेळ्यमेंढ्या, गुरे हाकणार्‍यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. मला तर नवलच वाटलं होतं. ‘बापरे! किती श्रीमंत असतील हे लोक आणि किती पुढारलेले!’ असं त्यावेळी वाटलं होतं. त्यांची चित्र आम्ही पाहिली होती. पँट, शर्ट, डोक्यावर हॅट घालणारे जंटलमॅन मेंढ्या हाकत होते. त्यावेळी आमचे गुराखी एक लंगोटी, खांद्यावर जुनी कांबळ किंवा तरट आणि हातात काठी घेऊन रानोमाळ गुरांच्या मागे पायपीट करत भटकत होते. पण परवा आमच्या गवळीवाड्यावरील गुराखी म्हशींच्या कळपामागून बाईक घेऊन डुगूडुगू जाताना पाहिला आणि आपण आपल्या बालपणीच्या ऑस्ट्रेलियाहून पुढे पोहोचल्याची खात्री पटली.
आमच्या बालपणी धुणं-भांडी, झाडलोट, सडा-सारवण, स्वयंपाक-पाणी या कामासाठी मोलकरीण ठेवणं हे आमच्या कल्पनेतही नव्हतं. गावातल्या एखाद्या श्रीमंत जमिनदाराकडे काही बायका-पुरुष कामाला जात, तेही विरळाच, तेसुद्धा तुटपुंज्या कपड्यांमध्ये. साधं सायकल वापरणंही परवडत नव्हतं. त्या परदेशी लोकांच्या स्तरावर आपण कधी पोहोचू असंही वाटलं नव्हतं. पण आता सारं चित्रच बदललं  आहे. तेव्हा कल्पेनतही खर्‍या न वाटणार्‍या घटना आज घडत आहेत.
मोलकरीण बाईही आता घरोघरी पोहोचली आहे. काही वर्षांमागे मळके, जुने कपडे घालून येणारी, मालक लोकांशी दबून असणारी; मोजून मापून नम्रतेने बोलणारी, वागणारी मोलकरीण आता दिसत नाही. आता तिला मोलकरीण किंवा ‘कामवाली बाई’ म्हटलेलंही आवडत नाही. आता ती हाऊसकिपर बनली आहे आणि या नावाला साजेसा तिच्या व्यक्तिमत्वात बदल झालेला आहे. ती आता टीपटॉप कपडे घालून पर्स खांद्याला अडकवून स्कूटरने कामाला जाते. पाहणार्‍याला वाटावे की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये, ऑफीसमध्ये जाता असावी. तिच्या वागण्या-बोलण्यातही बदल झाला आहे. ती आता आपल्या मालकांशी बरोबरीच्या नात्याने वागते. त्यांच्याशी छान गप्पा मारते. मनाविरुद्ध काही झालं तर सुनावतेही.
पूर्वीच्या मोलकरणीला आपलं काही चुकलं तर आपल्याला कामावरुन काढून टाकतील, आपला पगार कापतील अशी भीती वाटायची. आता मालकीणीलाच- आपलं काही चुकलं तर मोलकरीण काम सोडेल अशी भीती वाटते. सध्या मोलकरणींना खूप डिमांड आहे.
बदल हा काही वाईट नाही. शेवटी त्यांनाही आपण चांगलं चुंगलं (हाय-फाय) जीवन जगावं असं वाटत असेलच ना!
सध्याच्या छोट्या कुटुंबात पती -पत्नी दोघंही अर्थार्जनासाठी दिवस-दिवस घराबाहेर असतात. मग घरी असतात वृद्ध माणसं किंवा छोटी मुलं. त्यांच्यासाठी या कामवालीची नितांत गरज असते. बर्‍याच मोलकरणी अगदी स्वतःचं समजून आपुलकीने काम करणार्‍या असतात. लहान मुलांनाही जीव लावतात. अगदी थोडा वेळच येऊन कामं करत असल्या तरी कुटुंबातील एक सभासद बनून जातात.
माझ्याकडे जी बाई येते तीही अगदी अशीच आहे. गेल्या बावीस- तेवीस वर्षांपासून ती माझ्याकडे कामाला येते. येते फक्त दीड-दोन तासांसाठी, तरीही आमच्या कुटुंबाची एक सभासद बनून राहिली आहे. ही मूळची कर्नाटकातली. हिची आई तिथून उदरनिर्वाहासाठी गोव्यात आली होती. त्यामुळे अगदी बालपणापासून ही गोव्यात आहे. हिचं नाव संगव्वा. पण हिला जेव्हा समजू लागलं तेव्हा तिनं स्वतःच बारसं करुन ‘संगीता’ हे नाव धारण केलं. ही सात-आठ वर्षाची झाल्यावर ती हे काम करत आहे. मालक बदलतात पण काम तेच! माझ्याकडे ती दीर्घकाळ राहिली आहे.
ती अतिशय प्रामाणिक आणि विश्वसनीय आहे. इतकी की आम्ही घराची एक किल्ली तिच्या स्वाधीन केली आहे. म्हणजे आम्ही घरी नसलो तरी ती येऊन आपले काम व्यवस्थित करुन जाते. धुणी-भांडी, साफसफाई, कुंड्यांतील रोपांना पाणी देणे ही सगळी कामं तर ती करतेच पण कधी मला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर किंवा माझ्या अनुपस्थितीत ती स्वयंपाकही करते. ती म्हणजे माझ्या घराचा एक अत्यावश्यक अवयव बनली आहे.
पण गणेशचतुर्थी किंवा गावच्या जत्रेसाठी ती आठवड्यासाठी म्हणून जाते ती पंधरवडा उलटल्यावर परतते. हे प्रकरण वर्षातून तीन वेळा तरी होतं. मग आम्हीही विचार करतो, ‘जाऊ दे, मौजमजा करावी असं वाटत असेलच ना!’ आणि म्हणूनच बहुतेक ती आमच्याकडे इतकी वर्षे टिकून आहे.
आता तिने पन्नाशी ओलांडली आहे. तीन मुलांची आई आणि नातंवडांची आजीही बनली आहे. ती कष्टही खूप करते. सात-आठ घरी ती काम करते. तीन-चार घरी स्वयंपाकही करते. पण सकाळी जशी असते तशीच स्वच्छ आणि ताजीतवानी संध्याकाळपर्यंत असते. कधी तिचे कपडे ओले होत नाहीत की नाही कपड्यावर एखादा डाग पडत. विशेष म्हणजे ती ऍप्रनसुद्धा वापरत नाही. हे तिला कसं जमतं ते तीच जाणे.
आता नवीन झालेल्या मोलकरणी (सॉरी, हाऊसकीपर) स्कूटरवरुन फिरतात. पण संगीता अजूनही पायपीट करते. मी तिला बर्‍याच वेळा स्कूटर घेण्यासाठी सुचवून पाहिलं.. म्हटलं तेवढीच दगदग कमी होईल आणि वेळही वाचेल. पण ती म्हणते, ‘‘आता मला स्कूटर चालवायला जमणार नाही आणि चालते ते बरं आहे ना! मुद्दाम वॉकींगला जावं लागत नाही.’’
आमच्या घरातील प्रत्येक बर्‍यावाईट प्रसंगात ती माझ्याबरोबर असते. माझ्या लग्नकार्यात तर तिने अगदी घरच्यासारख्या माझ्या जबाबदार्‍या उचलल्या. मला खूप मदत केली. माझ्या यजमानांच्या आजारपणात जवळजवळ तीन वर्षे मला तिने खूपच सहाय्य केले. कितीही पैसे खर्च केले तरी अशी आपुलकीने काम करणारी माणसं खूप कमी भेटतात. त्यातली ही संगीता आहे. देव तिला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो!!