बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर कर्नाटकमध्ये तणाव

0
11

कर्नाटकातील शिवमोगा येथे रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हिजाबविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने हर्षची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी हर्षवर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्या हत्येचा संबंध त्याने सोशल मीडियावर केलेल्या हिजाबविरोधी पोस्टशी जोडला जात आहे. या हत्येनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात जोरदार तोडफोड केली. गाड्या पेटवल्या. तणाव वाढत असल्याचे पाहून शिवमोगामध्ये कलम १४४ लागू केले आहे. तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना २३ फेब्रुवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा राज्यात सध्या सुरू असलेल्या हिजाब वादाशी संबंध नाही; पण आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पुढील तपास अहवालाची वाट पाहत आहोत, असे कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले. दरम्यान, अरगा ज्ञानेंद्र यांनी शिवमोगा येथे मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.