बगदादी संपला, आयसिस नव्हे

0
225

नरक चतुर्दशीच्या रात्रीच अमेरिकेने सीरियाच्या वायव्येतील इडलिब प्रांतात केलेल्या एका धडाकेबाज कारवाईमध्ये आयसिसचा कुख्यात म्होरक्या अबु बकर अल बगदादीला नरकात पाठवले. एका परीने जग त्यामुळे खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी करीत आहे. अब्जावधी डॉलरचे बक्षीस असलेला मानवतेचा एक सर्वांत मोठा शत्रू अखेर संपला. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानातील अबोटाबादेत ज्या प्रमाणे धडक कारवाईत संपवला गेला होता, तशाच प्रकारे आयसिसचा हा सूत्रधार संपवला गेला. अमेरिकेची कारवाई सुरू होताच तो भ्याडपणे आपला जीव वाचवण्यासाठी रडत, भेकत भुयारात पळाला आणि स्वतःच्याच चिलखताचा स्फोट घडवत यमसदनी गेला असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले आहे. आता फक्त प्रश्न एकच आहे. लादेनच्या खात्म्यासरशी जशी अल कायदा जवळजवळ संपली, तशाच प्रकारे आयसिस आता संपणार आहे का? दुर्दैवाने याचे उत्तर अजून नकारार्थीच मिळते आहे. हे खरे की पाच वर्षांपूर्वीचा आयसिसचा प्रभाव आज नाही. त्यांनी इराक आणि सीरियामध्ये तयार केलेली खिलाफत ७४ देशांनी केलेल्या सातत्यपूर्ण संयुक्त कारवाईअंती निकाली निघाली आहे, परंतु आयसिसने दाखवलेल्या विषारी स्वप्नाने प्रेरित झालेले माथेफिरू आज देशादेशांमध्ये विखुरलेले आहेत आणि संधी मिळताच डोके वर काढण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. अल कायदाचा प्रभाव संपुष्टात आला, त्याला एका परीने आयसिसचा उदय कारणीभूत ठरला होता. आयसिस ही जगातील पहिलीच दहशतवादी संघटना होती जिला एका मोठ्या भूप्रदेशावर स्वतःचा ताबा प्रस्थापित करता आला होता. २०१४ चे ते चित्र भयावह होते. जगाचा थरकाप उडवणारे होते. इराक आणि सीरियामधील तब्बल ८८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर आयसिसने ताबा मिळवला होता. तेथील स्थानिक निवासींवर अनन्वित अत्याचार केले होते. मृत्यूचे अक्षरशः तांडव केले होते. जणु त्या भागामध्ये दानवी राजवट सुरू झालेली होती. ऐंशी लाख लोकसंख्येवर आयसिसने नियंत्रण मिळवले होते. मोसूलसारखे इराकमधील सर्वांत मोठे शहर या दहशतवाद्यांच्या ताब्यात गेलेले होते. सद्दामची जन्मभूमी टिक्रीटचा पाडाव झालेला होता. अनेक प्राचीन शहरे ताब्यात घेऊन तेथील पुरातन अवशेष नष्ट करण्याचा सपाटा आयसिसच्या माथेफिरूंनी लावला होता. तेलविहिरी ताब्यात घेण्यापासून खंडणी, अपहरणे, लुटालूट याद्वारे प्रचंड पैसाही त्यांनी गोळा केला. या सार्‍या प्रदेशाला स्वतःची खिलाफत घोषित करीत काळ्या कपड्यांतला अबु बकर अल बगदादी जेव्हा अल नुरी मशिदीच्या धर्मगुरूच्या मंचावर चढला, तेव्हा पुढे काय वाढून ठेवले आहे याची चुणूक जगाला लागली. हे लोण विविध खंडांपर्यंत पोहोचणारे होते. पाश्‍चात्त्य देशांतील अनेक उच्चशिक्षित मुस्लीम तरूण आयसिसला जाऊन मिळत होते. भारतातूनही काही माथेफिरू आयसिसला जाऊन मिळाले. बांगलादेशात जेव्हा भीषण दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आयसिसचे लोण भारताच्या सीमेपर्यंत येऊन थडकल्याचे दिसले होते. यावर्षीच्या सुरवातीच श्रीलंकेत झालेला भीषण हल्ला म्हणजे तर भारतासाठी दुसरी मोठी ललकार होती. त्या हल्ल्याचे धागेदोरे तर अगदी आपल्या केरळपर्यंत येऊन पोहोचले. काश्मीरमध्ये देखील अधूनमधून आयसिसचे काळे झेंडे फडकावले जात होते. बगदादीच्या खात्म्यातून या संघटनेचे सर्वोच्च नेतृत्व भले नेस्तनाबूत झाले असेल, परंतु आयसिसच्या राक्षसी विचारसरणीने प्रेरित झालेल्या आणि ठिकठिकाणी पसरलेल्या या लक्षावधी माथेफिरूंचे काय? ठिकठिकाणी पसरलेले हे लोक भले विखुरलेले असतील, परंतु बगदादीच्या मागून या राक्षसी विचारसरणीचे नेतृत्व स्वीकारायला जो कोणी पुढे येईल, त्याच्या मागून हे लोक जाणार नाहीत याची खात्री काय? आयसिसच्या नावाखाली ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले सातत्याने सुरू आहेत. हे सगळेच हल्ले आयसिस करते असे नव्हे, परंतु तिच्या नावे हे हल्ले चढवणारे स्वयंघोषित आयसिस समर्थक देशोदेशी आहेत. यंदाचा श्रीलंकेतील हल्ला तौहिद जमातने चढवला होता, परंतु आयसिसने त्याची जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजेच नावे वेगळी असली, चेहरे वेगळे असले, तरी त्यामागील प्रवृत्ती एकच आहे आणि संपूर्ण जगाला त्यापासून धोका आहे. गेल्या वर्षी आयसिसने तब्बल ३६७० दहशतवादी हल्ले चढवले. म्हणजे सरासरी दिवसाला ११ दहशतवादी हल्ले झाले. बगदादी संपला, म्हणून हा दहशतवाद संपणार नाही. त्याच्या बीमोडासाठी जागतिक एकजुटीवाचून दुसरा तरणोपाय नाही. पाकिस्तानसारख्या दहशतवादाची पाठराखण करीत आलेल्या देशाप्रती जोवर दुटप्पी नीती जागतिक महासत्ता राबवीत राहतील, तोवर अल कायदा किंवा आयसिससारख्या प्रवृत्ती या जगाच्या पाठीवरून नष्ट होणे शक्य नाही. जागतिक महासत्तांना खरोखरच मानवतेच्या शत्रूंपासून जगाला मुक्त करायचे असेल तर अशा प्रवृत्तींच्या पाठीराख्यांना आधी धडा शिकवणे जरूरीचे आहे. दुर्दैवाने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महासत्ताच हे भस्मासुर घडवतात आणि तेच शेवटी जगावर उलटतात!