- मीना समुद्र
नावीन्याची कास, आस, ध्यास आणि विश्वास यामुळे आपला येता काळ उजळून निघेल असेच त्याला मनोमन वाटत असते. म्हणून तो नववर्षाचे स्वागत करतो- असे स्वस्तिकासारखे बाहू पसरून, मनात शुभेच्छांचे स्वस्तिक रेखाटून…
कोण जाणे का, पण आज राहून राहून इंदिरा संतांच्या ‘या हो सूर्यनारायणा’ या कवितेची आठवण येत आहे. उगवत्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी त्यांनी अंगण सारवून त्यावर स्वस्तिक रेखाटलं आहे. मंगलसूचक हळदीकुंकवाने ते सुशोभित केले आहे. आणि मोठ्या उत्सुक मनाने सूर्योदयाची वाट पाहात त्याला लवकर येण्यासाठी विनवीत आहेत-
या हो सूर्यनारायणा, या हो या लवकर
सोनियाच्या पावलांनी, भूषवा हे घर
अशा साध्या, सोप्या, सरळ शब्दांत एका सोज्वळ, संस्कारी, आतिथ्यशील गृहिणीचे चित्र व्यक्त होतानाच दुसरीकडे मनात विचार येतात-
खरे तर असा सूर्योदय रोजच होत असतो. तरीही प्रत्येक दिवसाचा सूर्योदय वेगळा. त्याआधीचे आकाशात उमटणारे उषःकालाचे रंग वेगळे आणि प्रत्यक्ष सूर्योदयसमयी दिसणारी सूर्यबिंबाची तेजोमय आभा वेगळीच. त्यामुळे प्रत्येक दिवसही आगळावेगळा. प्रत्येक दिवस नवीन. दिवसाचा आरंभ करणारी प्रसन्न प्रभात आणि या प्रसन्नतेत भर घालण्यासाठी, त्या जगन्मित्राचे स्वागत करण्यासाठी काढलेली रांगोळी आहे स्वस्तिकाची!
‘स्वस्तिक’ हे स्वस्ति करणारे म्हणजेच कल्याणाचे, शुभाचे, मांगल्याचे प्रसन्न प्रतीक. सुरुवातीच्या ‘अधिक’ चिन्हातून अधिकाधिक देणारे, सांगणारे हे शुभचिन्ह! चारी दिशांनी बाहू पसरून अष्टदिशांनाच नव्हे तर दशदिशांना कवेत घेण्याचे सामर्थ्य असणारे हे विकसनशील प्रतीक! म्हणून तर आपल्या संस्कृतीचे प्रकाशदाता सूर्य, जगत्पालक विष्णू आणि कल्याणकारी वरुण अशा अनेक देवतांचा वास स्वस्तिकरूपात कल्पिला. अतिशय स्थिरचित्त होऊन शांतपात्रे, कलात्मक रीतीने ते रेखांकित आणि रंगांनी आणि विविधाकृतींनी सुशोभितही करता येते. म्हणून कलश वा ताम्हणात गणेश, लक्ष्मी, सत्यनारायण अशा पूजाप्रसंगी या देवमूर्ती प्रतिष्ठित करताना गंध, कुंकू वा तांदळाने स्वस्तिक काढून त्यावर स्थापना केली जाते. देवघर, मंदिरांपुढे अंगण-प्रांगणात स्वस्तिक रेखले जाते. चैत्रातले चैत्रांगण असो की औक्षणावेळीचा पाट असो, तिथे स्वस्तिकाचे अस्तित्व असतेच असते. बाळाच्या बारशाला त्याला पाळण्यात ठेवताना दुपट्यावरही स्वस्तिक आले. त्याला पांघरायच्या दुपट्यावर, गोधडीवरही स्वस्तिक असते. विवाहप्रसंगी वधुवरांच्या मधे धरलेल्या अंतरपाटावरही ते असते. काही अलंकारांतही याची गुंफण आढळते. पावित्र्याचे आणि शुभाचे हे प्रतीक स्वागतशील मनाचेही निदर्शक आहे.
आता नवीन वर्ष आले आहे. २०२० साल मोठ्या दिमाखाने, मोठ्या धूमधडाक्याने भूतलावर उवतीर्ण झाले आहे. हे सारे चक्रनेमिक्रमेण घडत असले तरी दिवसरात्रीचा आरा सर्वांचाच सहजपणाने, सोपेपणाने उलटला असेल असे नाही. सरळ, सुरळीतपणा असा फार थोड्यांच्या वाट्याला येतो बर्याचदा. तरी नववर्षाचा उल्हास, उत्साह अनोखा असतो. नव्या दिवसांवर सारे काही सोपविलेलेही दिसते. नववर्षाच्या खांद्यावर मान टाकून जणू मन निर्धास्त होणार असते. दुःखाचे प्रसंग, निराशा, अपयश सारे काही विसरून नव्या आशा पालवतात. माणसाच्या मनाला नावीन्याची ओढ असतेच. नावीन्याची कास, आस, ध्यास आणि विश्वास यामुळे आपला येता काळ उजळून निघेल असेच त्याला मनोमन वाटत असते. म्हणून तो नववर्षाचे स्वागत करतो- असे स्वस्तिकासारखे बाहू पसरून, मनात शुभेच्छांचे स्वस्तिक रेखाटून- ‘गुलाबी आनंदात न्हाऊ दे संसार’ अशी वत्सल आशा मनी बाळगून, इंदिराबाईंसारखीच! नव्या वर्षात ‘बंध रेशमाचे’ हे सदर करू करताना स्वस्तिकाच्या शुभचिन्हाने स्वागत, शुभेच्छा आणि लेखन विकसनशील होण्याची सुप्त इच्छाही आहे. त्यामुळेच ही कविता आठवली असावी.