बंडखोर

0
222


‘या आभाळाला ठिगळं लावण्यापेक्षा
इथून छावणी हलवलेलीच बरी’
म्हणत दादू मांद्रेकरांनी आपली इथली छावणी कायमची हलवली. खांद्याला बटवा आणि कॅमेरा लटकवून आपल्या अवतीभवती असूनही नसल्यागत वावरणारा हा माणूस आता आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही. समोरच्या प्रत्येकाकडून आपली उपेक्षाच होते आहे आणि तीही केवळ आपल्या जातीमुळेच होते आहे ही ठाम धारणा दादूंनी सदैव उराशी बाळगली आणि त्यातून ते नेहमीच जगाशी असे फटकून वागताना दिसले. अर्थात, जगाने त्यांची उपेक्षा केली हेही खरे आणि गोव्यात तर ती जनरीतच बनली आहे. येथे माणसांच्या हयातीत कर्तृत्वाची कदर होते कुठे?
आज दादू गेल्यानंतर जाणवते ते एक उत्तम कवी आणि साहित्यिक तर होतेच, परंतु उत्तम छायाचित्रकार, पत्रकार, अभ्यासक, वक्ता, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता, संपादक, विचारवंत अशी त्यांची अनेक रूपेही होती. फक्त आपल्यातलेच एक होऊन वावरणारे असल्याने त्यांचे मोठेपण इतरांना उमगलेच नाही. आपल्या समाजाच्या उत्थानाची जातिवंत कळकळ आणि तळमळ दादूंच्या बोलण्यातून सदैव व्यक्त होत असेच, परंतु आपल्या उपेक्षित समाजालाही आपण यातून वर आले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे याची जाणीव नाही हीच त्यांची सर्वांत मोठी खंत होती. म्हणूनच तर सुरवातीलाच उल्लेखिलेल्या कवितेत छावणी हलवण्यामागचे कारण ते पुढे लिहितात, ‘अस्पृश्यतेचे घोंगडे पांघरून अजून **तच मुसमुसणार्‍या माश्यांचा आता वीट आलाय…’
दादूंनी एका वेगळ्या गोव्याचे दर्शन आपल्या लेखणीतून या नवप्रभेमधूनच जगाला घडवले. ‘दलितांच्या दीन दुनियेत दादू’ ह्या त्या लेखमालेतून त्यांचे ‘बहिष्कृत गोमंतक’ साकारले. ‘तुम्ही कधीही न पाहिलेला गोवा’ असेच त्या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. वरवरच्या चकचकीत गिलाव्याखाली थोडे खरवडून पाहिले तर पोपडे उडालेले दिसावेत तसे हे एका वेगळ्या गोव्याचे विदारक चित्रण आहे. गोव्यामध्ये जातीयवाद नाही असे वरवर भासवले जात असले तरी या भूमीत त्या सरंजामशाही शक्ती ठिकठिकाणी पहारे बसवून बसल्या आहेत असा जळजळीत साक्षात्कार दादूंना कोवळ्या वयातच झाला. आईवडील परंपरेने चालून आलेला बांबूच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय करणारे. आईसोबत त्यासाठी जाताना ओसरीवर न घेता अंगणाच्या कोनाड्यात उभे करून वरून अन्न टाकणारे ‘दाते’ त्यांच्या संवेदनशील मनावर ओरखडे उमटवून गेले ते कायमचे. धनंजय कीरांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्र मागवून ती व्हीपीपी आईच्या सोन्याच्या कुड्या गहाण ठेवून सोडवून त्यांनी वाचले. त्यातून झालेली जागृतीची जाणीव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली –
‘तू झालास म्हणून मी माणूस झालो. किंवा माणसात तरी आलो..’
बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे त्या चरित्रात वाचून खंतावलेल्या त्यांना बुद्ध समजून घ्यावासा वाटला. मग बुद्धाचे पंचशील भेटले. प्रज्ञा, करुणा, बंधुभावाचा प्रेरणास्त्रोत गवसला. ‘बोधीवृक्षाच्या पानापानावर कोरलेली प्रज्ञा करुणेची सळसळ’ या तरुणाच्या जीवनामध्ये नवे चैतन्य घेऊन आली. कवितेतून प्रकटली. आपल्या आभाळावरचा सूर्यही ‘शापित’ आहे ही भावना खोलवर मनात रुजली होती ती कवितेवाटे बाहेर आली. माधवराव गडकरींसारख्या रत्नपारख्याने हे गावकुसाबाहेरचे रत्न पारखून त्याच्या जीवनाला आकार दिला. जडणघडणीच्या वयामधील या परिसस्पर्शाने, वाचनाने त्यांचा वैचारिक पाया पक्का झाला. पुढे सरकारी नोकरी, तेथील संघर्षपर्व, पुन्हा पत्रकारिता हा सगळा प्रवास करीत असताना ‘पर्यावरण’ आणि ‘प्रजासत्ताक’ सारखे स्वतंत्र प्रयोग त्यांनी केले. ‘प्रजासत्ताक’ हे त्यांनी एकहाती चार भाषांत चालवलेले नियतकालिक तर भारतीय संविधानाचा गजर करणारे अशा प्रकारचे एकमेव नियतकालिक असावे. दादूंनी ते राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. आंबेडकर, संविधान आदींवरील पुस्तके त्यांच्या प्रज्ञेची आणि प्रतिभेची चुणूक दाखवतात. देशामध्ये विज्ञानवादी बुद्धिक्षम सांस्कृतिक क्रांती घडावी हा दादूंचा ध्यास होता. त्यांच्या लेखनामधून तो सातत्याने व्यक्त होई. घट्ट वैचारिक अधिष्ठान असलेली प्रगल्भ भाषाशैली त्यांना लाभली होती. ‘कमलाक्षी’ सारख्या कवितेत हे भाषैवैभव दिसतेे. सामाजिक जाणिवाच्या कवितांमधून त्यांची बंडखोरी दिसते, तशी त्यांच्यातल्या छायाचित्रकारात त्यांची सौंदर्यासक्त दृष्टीही दिसते. समीक्षकांनी त्यांच्या कवितेला ‘विद्रोही कवितेतील ठराविक संकेतांचे अनुकरण करण्यात ती धन्यता मानते’ आणि काही ठिकाणी अकारण चढा सूर लावते’ म्हणून फटकारले, तरीही ‘त्यांच्या आणि त्यांच्या समाजाच्या आदिम वेदनेची वीणा लेखनातून सतत वाजत राहिली. ‘लाव्हाची ओंजळ’ हाती धरलेल्याच्या वाट्याला सुख कुठे येत असते? ते बंडखोर होते आणि शेवटपर्यंत बंडखोरच राहिले!