ज्याला खर्या अर्थाने ‘कायदेपंडित’ म्हणावे असे भारतातील एक सर्वोत्कृष्ट विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन हा एका भारतीय न्यायव्यवस्थेतील एका प्रदीर्घ युगाचा अस्त आहे. जो कोणी आपल्यापाशी मदत मागायला आला, त्याची पार्श्वभूमी, त्याच्यावरील आरोपांचे गांभीर्य न पाहता वा त्याच्याविषयीच्या जनमताची फिकीर न बाळगता, आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून त्याच्यासाठी सतत न्यायदेवतेच्या दरबाराची दारे ठोठावत आलेल्या जेठमलानींचे वर्णन एका शब्दात करायचे तर ‘बंडखोर’ असेच करावे लागेल. सुझान ऍडलमन यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्राचे शीर्षकही ‘द रिबेल’ असेच आहे. प्रवाहासोबत जाणे जेठमलानींना कधी जमलेच नाही. सतत प्रवाहाविरुद्ध जायची खुमखुमी या माणसापाशी होती, जिने असंख्य वादांची वादळे निर्माण केली, जनतेची नाराजी ओढवली, माध्यमांनी टीकास्त्रे डागली, परंतु कशाकशाचीही फिकीर न बाळगता आपल्या वकिली बाण्याशी प्रामाणिक राहून त्यांनी मोठमोठे खटले लढवले आणि जिंकले देखील! ज्या आरोपीचा खटला घ्यायला कोणी पुढे सरसावण्यास धजणार नाही अशांचे खटले लढवणे त्यांना जणू आवडायचे. आपल्या कायद्याच्या ज्ञानाला, वकिली कौशल्याला त्यांना जणू ते आव्हान वाटायचे. कायद्याचा कीस पाडून चालणारे त्यांचे न्यायालयातील प्रखर युक्तिवाद ऐकताना प्रतिपक्षाचे वकील तर चळचळ कापायचेच, परंतु न्यायाधीशांनाही आपल्यावरील जबाबदारीचे पुरेपूर भान ठेवावे लागायचे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासून जवळजवळ ७७ वर्षे त्यांनी वकिली केली. खरे तर वकिलीसाठी पात्रतेचे वय २१ होते, परंतु तेराव्या वर्षी मॅट्रिक आणि अठराव्या वर्षी एलएलबी केल्यानंतर वरील पात्रता वयालाच त्यांनी सिंधच्या न्यायालयात आव्हान दिले होते. फाळणीनंतर ते मुंबईत आले. येथे पुन्हा वकिली करण्यास मुंबई निर्वासित कायद्याचा अडसर आला तेव्हा त्या कायद्यालाच त्यांनी मुंबईच्या न्यायालयात आव्हान दिले. संघर्ष हा या माणसाचा स्थायीभाव होता. आणीबाणीत त्यांचा इंदिरा गांधींशी संघर्ष झडला, बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींशी त्यांनी दोन हात केले, आपल्याला राजकारणात आणणार्या व केंद्रात मंत्रिपदे देणार्या अटलबिहारी वाजपेयींविरुद्धच लखनौतून निवडणूक लढवायला त्यांनी कमी केले नाही, तसेच, ज्या नरेंद्र मोदींच्या राजकीय उदयाची पाठराखण केली, त्यांच्यावरच नंतर टीकेचे कोरडे ओढायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. जेठमलानींची विविध विषयांवरील भूमिका हे इतरांसाठी अनेकदा कोडे बनायचे, परंतु जे आपल्या मनाला वाटेल, जे आपल्या मनाला पटेल ते बेधडकपणे आणि कोणाचीही पर्वा न करता बोलून दाखवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती. हा परखडपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होता. त्याचे परिणामही त्यांना अर्थातच वेळोवेळी भोगावे लागले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी टीकेची झोड उठवली म्हणून दहा महिने कॅनडात जाऊन राहावे लागले, भाजपात राहून पक्षनेतृत्वाला फैलावर घेतले म्हणून पक्षाने सहा वर्षे पक्षातून बडतर्फ केले, परंतु या गोष्टींची फिकीर त्यांनी कधी केली नाही. ते ताठ मानेने जगले आणि ताठ मानेने न्यायालयात लढले. कायदेशीर लढाई ही न्यायालयात अनेक अंगांनी कशी लढता येते हे त्यांनी दाखवून दिले. देशातील सर्वाधिक फी घेणारे ते वकील होते, पण पैसा कमावणे हे ध्येय कधीच नव्हते. आपण फक्त १० टक्के अशिलांकडून प्रचंड फी आकारतो असे ते म्हणत. अनेकांसाठी तर त्यांनी एक रुपया घेऊन अथवा निःशुल्क युक्तिवाद केले! त्यांच्या वकिलीची प्रदीर्घ कारकीर्द पाहिली तर लक्षात येते की किती वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांची वकिली त्यांनी केली. अक्षयकुमारचा ‘रुस्तम’ चित्रपट ज्यावर बेतला आहे त्या कावस नानावटी खटल्यापासून त्यांची वकिली कारकीर्द बहरत गेली. मुंबईतल्या हाजी मस्तानपासून एके ४७ बाळगणार्या संजय दत्तपर्यंत, इंदिरा आणि राजीव हत्याकांडांतील आरोपींपासून संसद हल्ल्यातील अफजल गुरू आणि गिलानीपर्यंत, जेसिका हत्याकांडातील मनु शर्मापासून बलात्कार प्रकरणातील आसाराम बापूपर्यंत, हर्षद मेहता, केतन पारेख पासून ललित मोदीपर्यंत, चारा घोटाळ्यातील लालूप्रसाद यादवांपासून स्पेक्ट्रम घोटाळ्यातील कनिमोळीपर्यंत अनेक कुख्यात आरोपींचे खटले त्यांनी लढवले. ‘आपण आपल्याकडे येणार्याचे वकीलपत्र घेतले नाही तर ती आपल्या वकिली बाण्याशी प्रतारणा ठरेल’ अशी त्यांची यावर सुस्पष्ट भूमिका होती. त्यामुळे अनेकदा भ्रष्ट, राष्ट्रद्रोही प्रवृत्तींना जेठमलानींच्या या भूमिकेचा गैरफायदा मिळाला. कित्येकांची फाशी जन्मठेपेत रुपांतरित झाली, अनेकजण मोकळे सुटले, परंतु एक गोष्ट मात्र लखलखीत राहिली ती म्हणजे जेठमलानींचे प्रचंड कायदेशीर ज्ञान. एवढा प्रदीर्घ काळ न्यायालयांत घालवल्यावर अजूनही आपला कायद्यावर विश्वास आहे का असे त्यांना एकदा नंदिता हक्सर यांनी विचारले. त्यावर निःशंकपणे ते उत्तरले होते, ‘हो! आहे!!’’ भारतीय न्यायव्यवस्थेवर दृढ श्रद्धा ठेवणार्या या बंडखोर लढवय्याला आपण मुकलो आहोत!