राजकोट येथे सुरू असलेल्या सीनियर महिलांच्या टी-ट्वेंटी स्पर्धेत काल गोवा संघाला बंगालकडून ४ गडी राखून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याला ८ गडी गमावून केवळ १०२ धावांपर्यंत पोहोचता आले. बलाढ्य बंगालने विजयी लक्ष्य १६.३ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात गाठले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गोवा संघाकडून सलामीवीर श्रेया परब हिने सर्वाधिक ५८ धावांचे योगदान दिले. केवळ ५४ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांसह तिने आपली खेळी सजवली. सुनंदा येत्रेकरने १७ व विनवी गुरवने १२ धावा जमवल्या. इतरांनी निराशा केली.
बंगालच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना केवळ एक अवांतर धाव दिली. बंगालकडून डावखुरी फिरकीपटू गोहर सुल्ताना हिने १६ धावा मोजून सर्वाधिक ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बंगालने अंतरा जाना (२५), रुमेली धर (२१), रिचा घोष (नाबाद १८) यांच्या बळावर सहज विजय साध्य केला. गोवाकडून संजुला नाईक, रुपाली चव्हाण व सुनंदा येत्रेकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.