बंगळुरू-एफसी गोवा चुरशीची लढत आज

0
241

इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) पुढील टप्पा आजपासून सुरु होत असून गतविजेता बंगळुरू एफसी आणि एफसी गोवा हे तुल्यबळ संघ शुक्रवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर आमनेसामने येत आहेत.

गोवा आघाडी वाढविण्याचा, तर बंगळुरू पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न करेल. या दोन संघांमध्ये पाच गुणांचा फरक आहे, बंगळुरू जिंकून तो दोन गुणांवर आणण्याचा प्रयत्न करेल. उभय संघांमधील पहिला सामना गोव्याने जिंकला. त्यानंतर बंगळुरूने वर्चस्व राखले असून पाच सामन्यांत ते अपराजित आहेत.

गोव्याचे सहाय्यक प्रशिक्षक जीझस टॅटो यांनी सांगितले की, आम्ही आयएसएलमधील एका सर्वोत्तम संघाला सामोरे जात आहोत. आमच्यासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, पण या घडीला जास्त दडपण बंगळुरूवर आहे. आमच्यातील फरक पाच गुणांचा आहे. आम्ही आत्मविश्वासाने खेळू शकतो आणि तीन गुण जिंकले तर आमच्यातील फरक आठपर्यंत वाढेल.

गोव्यासमोरील आव्हान थोडे जास्त कठीण झाले असेल. याचे कारण मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा मैदानालगत उपस्थित राहू शकणार नाहीत. गोव्याची मागील लढत चेन्नईन एफसीविरुद्ध झाली. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली. गोव्याची मदार स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्यावर असेल. अलिकडेच त्याला फॉर्म गवसला आहे. बंगळुरूच्या जुआनन आणि अल्बर्ट सेरॅन अशा प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मात्र त्याला धडाका दाखविता आलेला नाही. ब्रँडन फर्नांडिस हा सुद्धा महत्त्वाचा खेळाडू असेल. त्याने दोन सामन्यांत दोन गोल केले आहेत आणि पाच गोलांमध्ये वाटा सुद्धा उचलला आहे. २५ वर्षांच्या ब्रँडनची कामगिरी भारतीय खेळाडूंत सरस ठरली आहे. बंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, आम्ही यंदा चांगली कामगिरी करतो आहोत. गेल्या मोसमासारखीच ही स्थिती आहे. तेव्हा मिकू हा प्रमुख खेळाडू नऊ सामन्यांत नव्हता. यावेळी मॅन्यूएल ओन्वू सात सामने खेळू शकलेला नाही. तुम्ही गोल करणार्‍यांची यादी पाहिली तर प्रत्येक संघातील हे खेळाडू परदेशी असल्याचे दिसून येईल. अखेरीस फुटबॉलमध्ये संघाचे संतुलन महत्त्वाचे असते. गेल्या दोन मोसमांत बाद फेरीसाठी संघर्ष करण्याइतके संतुलन आमच्या संघात राहिले आहे. बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या संघांविरुद्ध बंगळुरूला झगडावे लागले आहे. एटीके आणि मुंबई सिटी एफसी यांच्याविरुद्ध ते हरले. यंदा गोव्याविरुद्ध पहिल्या लढतीत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. अशावेळी कुआद्रात यांचा संघ पुरेपूर तयारीनीशी खेळण्याच्या निर्धाराने मैदानवर उतरेल.

या लढतीचा निकाल सेट-पिसेसवरील कामगिरीवर अवलंबून असेल. दोन्ही संघ याबाबतीत आक्रमक कामगिरी करीत आहेत. गोव्याचे २२ पैकी ११ गोल अशा पद्धतीने झाले आहेत. बेंगळूरूचा हा आकडा ११ पैकी सहा असा आहे. याशिवाय सेट-पिसेसवरील बचावाचे दोन्ही संघांचे रेकॉर्डही उत्तम आहे.

गोव्याचा मंदारराव देसाई पूर्वी बंगळुरूसाठी खेळला आहे. त्याने सांगितले की, बंगळुरू सेट-पीसेसवर लक्ष केंद्रीत करतात असा माझा तेथे असतानाचा अनुभव आहे. ते यासाठी खास सराव सत्र घेतात. उदांता सिंग, आशिक कुरुनियन अशा खेळाडूंविरुद्ध आम्हाला सावध राहावे लागेल. मुख्य म्हणजे आम्हाला स्वतःचा खेळ करावा लागेल, जो आमच्या प्रशिक्षकांना अपेक्षित असेल.
हे स्टेडियम बंगळुरूसाठी बालेकिल्ला ठरले आहे. त्यामुळे तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्धची लढत रंगतदार ठरेल.