1 मार्च रोजी बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 10 जण जखमी झाले. या प्रकरणी काल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कर्नाटकातील बेल्लारी येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. बेल्लारी येथून काल ताब्यात घेतलेली व्यक्ती काहीशी हल्ल्यातील मुख्य आरोपीसारखी दिसते; मात्र, तोच आरोपी आहे की नाही, हे अद्याप सांगता येणार नाही, असे एनआयएने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सध्या अधिकारी संशयिताची चौकशी करत आहेत. 1 मार्चला स्फोट झाला तेव्हा तो कुठे होता, अशी विचारणा केली जात आहे, असे एनआयएने म्हटले आहे. तपासादरम्यान एनआयएला सीसीटीव्ही फुटेजवरून कळले होते की टोपी घातलेल्या एका आरोपीने स्फोटापूर्वी कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला होता. त्याने चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्यामुळे एनआयएने सीसीटीव्ही फुटेजही जारी केले होते. तसेच 6 मार्च रोजी या बॉम्बस्फोटातील आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.