बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास स्फोट झाला. एका व्यक्तीने कॅफेमध्ये बॅग सोडली, त्यानंतर स्फोट झाला. या घटनेत 9 जण जखमी झाले, त्यात कॅफेच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते धोक्याबाहेर आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्फोटाच्या घटनेला दुजोरा दिला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, फॉरेन्सिक आणि एनआयएची टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा कॅफेच्या भिंतीवरील काचा फुटून टेबलावर विखुरल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. व्हाईटफिल्ड अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कॅफेमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये स्फोटाच्या ठिकाणी बॅटरी, एक जळालेली बॅग आणि काही ओळखपत्रे सापडली आहेत. त्याआधारे बॉम्बस्फोटाचा कट असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. पोलिसांच्या तपासात एका व्यक्तीने 12 वाजण्याच्या सुमारास कॅफेत बॅग ठेवल्याचे समोर आले आहे. या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. तिथे कोणीतरी मुद्दाम बॅग ठेवल्याचे समोर आले असून, असे प्रकार पुन्हा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर कोणीही राजकारण करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.