रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १३व्या पर्वातील एलिमिनेटर लढत अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर रंगणार आहे.
ऑस्ट्रेलियन स्टार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने गटफेरीतील शेवटच्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करीत गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवित प्लेऑफमध्ये धडक दिलेली आहे. तर टीम इंडियाचा आक्रामक कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला दिल्लीने केलेल्या संथगतीच्या खेळीमुळे प्लेऑफमध्ये संधी मिळाली. सनरायझर्स हैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली एक वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविलेले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला अजूनही जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट सेनेचा प्रयत्न हैदराबादवर मात करीत क्वॉलिफायर-२मध्ये धडक देत अंतिम फेरीत प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत राखण्यावर असेल.
सनरायझर्स हैदराबादही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या मार्गावर होता. परंतु विजयांची हॅट्ट्रिक करीत त्यांनी प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. शेवटच्या लढतीत त्यांनी बलाढ्य मुंबई इंडियन्सवर एकतर्फी मात केली होती. त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात ते पूर्ण आत्मविश्वासाने मैदानावर उतरतील. मुंबईविरुद्धच्या लढतीत त्याने १४९ धावांचे मिळालेले विजयी लक्ष्य दहा विकेट्नी गाठले होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाबाद ८५ तर वृद्धिमान साहाने नाबाद ५८ धावांची खेळी करीत संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. साहाला संधी दिल्यानंतर संघाचा चेहराच बदललेला आहे. शेवटच्या तीन सामन्यात संघाच्या विजयात साहाने मोलाची भूमिका निभावलेली आहे. मनीष पांडेही उपयुक्त फलंदाजी करीत आहे. केन विल्यमसन आणि जेसन होल्डरकडेही संघाला जिंकून देण्याची क्षमता आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा, राशीद खान, जेसन होल्डर प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.
दुसर्या बाजूने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडेही अंतिम सामन्यापर्यंत धडक देण्याची क्षमता आहे. गट फेरीतील शेवटच्या सामन्यात दिल्लीकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु कोलकातापेक्षा सरस धावसरासरी राखत त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. संघ कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स आणि देवदत्त पडिक्कल यांच्यावर अवलंबून आहे. यापैकी कोणी अपयशी ठरल्यास त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात संघाचा विजय हा या तिघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
सनरायझर्स हैदराबाद (संभाव्य) ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), वृध्दिमान साहा (यष्टिरक्षक), मनीष पांडे, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशीद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी. नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (संभाव्य)ः आरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, ख्रिस मॉरिस, ईसुरु उदाना, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.