बंगलोरचा सलग सहावा पराभव

0
112

>> दिल्ली कॅपिटल्सचा चार गड्यांनी विजय

कर्णधार श्रेयस अय्यरने टोकलेले अर्धशतक व कगिसो रबाडाच्या प्रभावी मार्‍यावर आरुढ होत दिल्ली कॅपिटल्सने काल रविवारी रविवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १२व्या पर्वातील विसाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ४ गड्यांनी पराभव केला.

बंगळुरुचा या हंगामातला हा सलग सहावा पराभव ठरला आहे. १५० धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावणे बंगलोरच्या गोलंदाजांना जमले नाही. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीचा कालच्या सामन्यातला विजय सुकर झाला. श्रेयस अय्यरने ६७ धावांची खेळी केली.

सलामीवीर शिखर धवनला शून्यावर बाद करत बंगलोरने सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. मात्र यानंतर सामन्यावरील पकड राखणे त्यांना जमलेच नाही. श्रेयस अय्यरने आश्‍वासक खेळी करत आपला संघ संकटात सापडणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. त्याला पृथ्वी शॉ, कॉलिन इंग्राम आणि ऋषभ पंत यांनी उपयुक्त भागीदार्‍या रचत मोलाची साथ दिली. बंगलोरकडून नवदीप सैनीने २ तर मोईन अली, टीम साऊथी, मोहम्मद सिराज आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध मार्‍यासमोर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ घरच्या मैदानावर पुन्हा एकदा अडखळला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दिल्ली कॅपिटल्सने बंगलोरचा डाव १४९ धावांपर्यंत मर्यादित ठेवला. बंगलोरच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी केली खरी, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमवणे त्यांना जमले नाही. लामिछाने वगळता दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी बंगलोरच्या फलंदाजांवर अंकुश लावला.
बंगलोरच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसर्‍या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एबी डीव्हिलियर्स, मार्कुस स्टोईनिस ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मोईन अलीच्या साथीने विराट कोहलीने फटकेबाजी करत संघाला दीडशेच्या जवळपास नेले. कगिसो रबाडाने एकाच षटकात ३ फलंदाजांना माघारी धाडत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. १७व्या षटकाअखेर बंगलोरचा संघ ४ बाद १३३ अशा सुस्थितीत होता. किमान १६० धावांपर्यंक त्यांचा संघ जाणे अपेक्षित होते. परंतु, मोक्याच्या क्षणी त्यांना खेळ उंचावणे शक्य झाले नाही. शेवटच्या तीन षटकांत बंगलोरला केवळ १६ धावा जमवणे शक्य झाले. कगिसो रबाडाने टाकलेल्या डावातील १८व्या षटकात बंगलोरने ३ गडी गमावताना केवळ पाच धावा जमवल्या.

दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४, ख्रिस मॉरिसने २ बळी घेतले. त्यांना डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि नेपाळचा लेगस्पिन गोलंदाज संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी १ बळी घेत चांगली साथ दिली. उभय संघांनी या सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. सलग सहाव्या पराभवामुळे स्पर्धा मध्यावर पोचण्यापूर्वीच बंगलोरचा संघ बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः पार्थिव पटेल झे. लामिछाने गो. मॉरिस ९, विराट कोहली झे. अय्यर गो. रबाडा ४१, एबी डीव्हिलियर्स झे. इंग्राम गो. रबाडा १७, मार्कुस स्टोईनिस झे. तेवतिया गो. पटेल १५, मोईन अली यष्टिचीत पंत गो. लामिछाने ३२, अक्षदीप नाथ झे. पंत गो. रबाडा १९, पवन नेगी झे. पंत गो. रबाडा ०, टिम साऊथी नाबाद ९, मोहम्मद सिराज पायचीत गो. मॉरिस १, युजवेंद्र चहल नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ८ बाद १४९
गोलंदाजी ः इशांत शर्मा ४-०-३१-०, ख्रिस मॉरिस ४-०-२८-२, कगिसो रबाडा ४-०-२१-४, अक्षर पटेल ४-०-२२-१, संदीप लामिछाने ४-०-४६-१
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. नाथ गो. नेगी २८, शिखर धवन झे. सैनी गो. साऊथी ०, श्रेयस अय्यर झे. चहल गो. सैनी ६७, कॉलिन इंग्राम पायचीत गो. अली २२, ऋषभ पंत झे. साऊथी गो. सिराज १८, ख्रिस मॉरिस झे. डीव्हिलियर्स गो. सैनी ०, अक्षर पटेल नाबाद ४, राहुल तेवतिया नाबाद १, अवांतर १२, एकूण १८.५ षटकांत ६ बाद १५२
गोलंदाजी ः टिम साऊथी २-०-२४-१, नवदीप सैनी ४-०-२४-२, युजवेंद्र चहल ४-०-३६-०, पवन नेगी ३-०-२७-१, मोहम्मद सिराज १.५-०-१४-१, मोईन अली ४-०-२२-१