पर्रा-काणका येथील इंडियन ओव्हरसिस बँकेवर गेल्या शुक्रवारी पडलेल्या दरोड्यातील सूत्रधारास अटक करण्यात पोलिसांना काल यश आले. म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल ईशांत वाटांगी, फ्रँकी वाझ, राजेश कांदोळकर, सुनिल रेडकर, नितीन नाईक यानी काल बांबोळी येथे सापळा रचून मूळ बिहार व सध्या काणका येथे राहणार्या राजकुमार ऊर्फ राजू दास या सूत्रधारास अटक केली.
या दरोड्यावेळी स्थानिक लोकांनी इरादास व विजयदास या बिहार येथील दोघांना पकडून येथेच्छ चोप दिला होता व त्यांना म्हापसा पोलिसांच्या हवाली पिस्तूलसहीत दिले होते. म्हापसा पोलिसांनी सांगितले की आतापर्यंत तीन संशयित दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
बांबोळी येथील हा तिसरा संशयित राजकुमार ऊर्फ राजू हा कुणाची तरी वाट पहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या तीन तुकड्या पाठविण्यात आल्या. त्यांनी राजकुमार ऊर्फ राजू याला पकडले. लवकरच अन्य तीन संशयितांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.
उपनिरीक्षक ऐलिडीओ फर्नांडिस यांनी सांगितले की, राजू दास तिसरा संशयित दरोडेखोर हा गेल्या १०/१२ वर्षांपासून काणका-पर्रा येथे राहत होता.
काल तो बांबोळी येथे कुणाची तरी ४.१५ वा. वाट पाहत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी आझिलो इस्पितळात पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या दरोड्याचा तपास पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली इतर पोलिस करीत आहेत.