‘फ्लाय 91′ ची गोवा – लक्षद्वीप विमानसेवा

0
20

>> मोपा विमानतळावरून पर्यटकांना सेवा उपलब्ध

गोव्यातून अवघ्या दोन तासांचा विमान प्रवास करून तुम्हांला अगदी शुभ्र वाळू, स्वच्छ किनारे व नयनमनोहर आणि नेत्रदीपक असे निसर्ग सौंदर्य असलेल्या एका जादुई बेटावर जाण्याची संधी मिळाली तर? कल्पनेनेच तुम्ही अगदी आनंदी होऊन गेलात ना. ‘फ्लाय 91′ ह्या गोव्यातील एका प्रादेशिक विमान कंपनीने तुमच्यासाठी आता ही सोय उपलब्ध करून दिली आहे. स्थळ आहे लक्षद्वीप. दक्षिण भारतातील केरळ ह्या राज्यात अरबी समुद्रात लक्षद्वीप हे बेट आहे. लक्षद्वीप म्हणजे कित्येक बेटांचा समूह. अत्यंत पांढरी व स्वच्छ वाळू व तितकेच स्वच्छ समुद्रकिनारे यामुळे आता लक्षद्वीप हे पर्यटन स्थळ अत्यंत लोकप्रिय ठरलेले आहे.

गोमंतकीय तसेच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या बेटावर जाण्यासाठी काल-परवापर्यंत थेट विमानसेवा नव्हती. मात्र, ‘फ्लाय 91′ ह्या विमान कंपनीने आता ‘गोवा ते लक्षद्वीप’ अशी विमानसेवा सुरू केल्याने आता या बेटांच्या समुहावर पर्यटनासाठी जाण्यास उत्सुक असलेल्या पर्यटकांची चांगली सोय झालेली आहे.

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपले निवासस्थान आहे. आम्हाला सरकारच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम (आरसीएम) उड्डाण अंतर्गत मार्गांचा पहिला संच वाटप करण्यात आला आहे, असे फ्लाय 91 विमान कंपनीतील सूत्रांनी सांगितले. या मार्गांमध्ये लक्षद्वीप अगत्री तसेच बेंगळुरू, गोवा व हैद्राबाद या इतर व्यवसाय आणि विश्रांतीच्या ठिकाणांचा समावेश आहे. ह्या पार्श्वभूमीवर आम्ही गोवा हैद्राबाद, बेंगळुरू, सिंधुदुर्ग, अगत्री व जळगाव येथे उड्डाणे सुरू केली असल्याचे कंपनीच्या सूत्रानी सांगितले.

आम्ही फ्लाय नाईंटीवन नाही तर फ्लाय नाईन-वन आहोत. आम्ही प्रादेशिक विमान कंपनी आहोत म्हणून आम्ही ‘प्लस 91′ या कंट्री कोडाहून प्रेरित होऊन हे नाव निवडले आहे. फ्लाय 91 चे चिन्ह हे उडणाऱ्या सुंदर फुलपाखरावर आधारित आहे. फुलपाखराप्रमाणे देशाच्या चारही भागात पंख पसरविण्याचे, भारताला जोडण्याचे व लोकांना एकत्र आणण्याचे आमचे ध्येय आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. आमच्या फ्लाइटमधील खाद्य पदार्थ व पेये 100 रु. च्या फ्लॅट शुल्काध्ये उपलब्ध आहेत.

आमची सुरवातीची 6 विमाने गोव्यात, त्यानंतर नोयडा, नवी मुंबई व त्यानंतरच्या तळावर आधारित असतील. पहिली सहा विमाने मोप विमानतळावरून उडतील. तेथून 8 ते 10 शहरांना जोडले जाणार आहे. पुढील 5 वर्षांत 39 विमानांचा ताफा असेल. त्याद्वारे 8 ते 10 शहरांना जोडले जाणार आहे. त्यानंतरच्या 5 वर्षांत देशभरातील 50 शहरांत आमची विमाने उड्डाण करतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. फ्लाय 91च्या छोट्या विमानातून प्रवास करणे हा सुद्धा एक आगळा वेगळा असा अनुभव आहे.