>> अंतिम सामन्यात क्रोएशियावर ४-२ ने मात
फ्रान्सने काल रविवारी झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला ४-२ असे पराभूत करत दुसर्यांदा फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले. यापूर्वी फ्रान्सने १९९८ मध्ये पहिल्यांदा फुटबॉल विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्यावेळी त्यांनी ब्राझिलला पराभूत करत विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. तर २००६ साली इटलीकडून फ्रान्सला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. फ्रान्सला २० वर्षांनी फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात यश आले. खेळाडू म्हणून व आता प्रशिक्षक म्हणून विश्वविजेतेपद पटकावणारे दिदिएर डेसचॅम्प्स हे जगातील तिसरे व्यक्ती बनले आहेत.
फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल झळकावला. सामन्याच्या पूर्वार्धात उभय संघांकडून गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. विश्वचषक स्पर्धेची पहिली अंतिम लढत खेळणार्या क्रोएशियाच्या खेळाडूंनी माजी विजेत्या फ्रान्सला घाम गाळण्यास भाग पाडले. पहिल्या १५ मिनिटांत त्यांच्याकडून गोल करण्याचे दोन सुरेख प्रयत्न झाले. पेरिसिच आणि मॅन्झुकिच यांनी फ्रान्सच्या बचावपटूंची कसोटी पाहिली पण फ्रान्सचा बचावपटू उमटिटी आणि पव्हार्ड यांनी पेनल्टी क्षेत्रात चोख कामगिरी बजावताना क्रोएशियाला यशापासून दूर ठेवले. सामन्याच्या १८व्या मिनिटाला फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी स्वयंगोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही.
२८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर पेरिसिचने प्रतिबंधित क्षेत्रात चेंडू अवैधरित्या हाताळल्याने ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. या पेनल्टी किकवर गोल करत ग्रीझमनने फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ५९ व्या मिनिटाला पॉल पोग्बाने तिसरा गोल करीत फ्रान्सची आघाडी ३-१ अशी फुगवली. ६५व्या मिनिटाला एम्बापेने चौथा गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. किशोरवयीन असताना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गोल करणारा फ्रान्सचा कायलन एम्बापे हा ब्राझिलच्या पेले यांच्यानंतरचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. ६९ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने गोल करून संघासाठी दुसरा गोल केला खरा पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर फ्रान्सन ेक्रोएशियावर ४-२ अशी मात करीत फिफा विश्वचक उंचावला. विजेत्या फ्रान्सने ३८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३६० कोटी) रुपयांची कमाई केली. उपविजेत्या क्रोएशियाला २८ दशलक्ष डॉलर्स (१९१ कोटी) रुपये प्राप्त झाले.
विश्वचषकाच्या ‘क’ गटात फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला २-१ असे हरवून विजयी सलामी दिली. मग फ्रान्सने पेरुवर १-० अशी मात केली. त्यानंतर फ्रान्स व डेन्मार्क यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. फ्रान्सने खरी कमाल केली ती बाद फेरीत. त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचे आव्हान ४-३ असे परतवून लावले. मग फ्रान्सने उरुग्वेवर २-० असा विजय साकारला. त्यानंतर फ्रान्सने बेल्जियमला १-० असे हरवून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते.