>> बेल्जियमवर १-० अशी मात; उमटिटीचा हेडर ठरला निर्णायक
बचावपटू सॅम्युअल उमटिटीने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर १९९८च्या विश्वविजेत्या फ्रान्सने बेल्जियमचे आव्हान १-० असे मोडित काढत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गेल्या २४ सामन्यांत बेल्जियम संघ अपराजित होता. परंतु फ्रान्सने त्यांची ही घोडदौड रोखली.
या विजयामुळे फ्रान्सला सुमारे २० वर्षानंतर पुन्हा एकदा दुसर्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी त्यांनी १९९८मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेचे पहिल्यांदा अजिंक्यपद पटकाविले होते. त्यांनी तिसर्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. १९९८ आणि २००६मध्ये त्यांनी अंतिम फेरीत धडक दिली होती. १९९८मध्ये त्यांनी ब्राझीलवर ३-० अशी मात करीत विश्वजेतेपद पटकाविले होते. तर २००६मध्ये त्यांना अंतिम सामन्यात इटालीकडून पेनल्टी शूटआऊटवर पराभव स्वीकारावा लागला होता. बेल्जियमविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेच्या तीन सामन्यांमधील फ्रान्सचा हा तिसरा विजय आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. १८व्या मिनिटाला फ्रान्सला गोल करण्याची संधी मिळाली, मात्र मातुइदीने चेंडू थेट कोर्ताईसच्या हातात सोपवला आणि संधी हुकली. सामन्यात ६४ टक्के चेंडूवर नियंत्रण ठेवलेल्या बेल्जियमने बर्याच संधी दवडल्या. १९व्या मिनिटाला त्यांना संधी चालून आली होती. परंतु फ्रान्सच्या बचावपफळीने बेल्जियमचे प्रयत्न उधळून लावले. २१व्या मिनिटला बेल्जियमला आणखी एक संधी मिळाली होती. परंतु कॉर्नर किकवर घेतलेला फटका फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक ह्युगो लॉरिस याने उडी घेत हा गोल रोखला. २७व्या मिनिटाला डाव्या विंगेतून डी ब्रूयनने गोलतोंडवर उभ्या असलेल्या सॅम्युअल उमटिटीकडे चंेंडू पास केला होता. परंतु परंतु त्याच्याकडे पोहोचण्यापूर्वीच बेल्जियमच्या बचावपटूंने त्यावर नियंत्रण मिळवित संघावरील संकट टाळले. ३१व्या आणि ४४व्या मिनिटाला फ्रान्सला दोन फ्री-किक मिळाल्या होत्या. परंतु त्यांनी त्या वाया घालविल्या.
दुसर्या सत्रात फ्रान्सने काहीशा आक्रमक खेळावर भर दिला होता. ५०व्या मिनिटाला त्यांना गोलसंधी निर्माण झाली होती. गिरौडने घेतलेला जोरकस फटका बेल्जियमच्या कोंपानीने ब्लॉक केल्याने चेंडू कॉर्नरसाठी गेला. त्याच संधीचा फायदा उठवित ५१व्या मिनिटाला आंतोनिओ ग्रीझमनने घेतलेल्या कॉर्नरकिकवर फ्रान्सचा बचावपटू सॅम्युअल उमटिटीने मारोएन फॅलायनीला मागे टाकत हेडरद्वारे चेंडूला जाळीची दिशा दाखवली. उमटिटीचा हा कारकिर्दीतील तिसरा तर फ्रान्सच्या यंदाच्या विश्वचकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करून देणारा या सामन्यातील एकमेव गोल ठरला. बेल्जियमला ८१व्या मिनिटाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली, परंतु एक्सेल विटसेलच्या फटका लॉरिसने रोखला.
जागतिक तिसर्या स्थानी असलेल्या बेल्जिमयने उपांत्यपूर्व सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या ब्राझिलवर २-१ अशी मात केली होती. त्यामुळे या सामन्यातीही त्यांच्याकडून तशाच प्रकारच्या अनपेक्षित निकालाची अपेक्षा होती. परंतु त्यांनी बर्याच संधी गमावल्याने त्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.