
अचूक, अफलातून व सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर लुझनिकी स्टेडियमवरील अंतिम लढतीत ८० हजारहून अधिक प्रेक्षकांच्या तसेच जगभरातील दूरचित्रवाणीवरील कोट्यवधी फुटबॉल शौकिनांच्या साक्षीने क्रोएशियावर ४-२ अशी मात करीत फ्रान्सने झळाळत्या विश्व फुटबॉल विश्वचषकावर २० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासातील एक अप्रतिम, संस्मरणीय व नेत्रदीपक अशी कालची अंतिम लढत ठरली. दिदियर डेस्चॅम्पच्या मार्गदर्शनाखालील आणि ह्युगो लॉरिसच्या कर्णधारपदाखालील फ्रान्सच्या सूत्रबध्द खेळाने या लढतीत सुरूवातीपासून गाजवलेले वर्चस्व शेवटपर्यंत कायम राखले. त्याचबरोबर पृथ्वीतलावरील अवघ्या ४२ लाख लोकसंख्येच्या छोट्या क्रोएशिया संघाने अंतिम लढतीपर्यंत मारलेली मजल व तुल्यबळ फ्रान्सला दिलेली झुंज हीसुध्दा प्रशंसनीय अशीच ठरली. अंतिम लढतीत एकूण अर्धा डझन गोल नोंदले गेले.
फ्रान्सच्या या देदिप्यमान यशाला एक आगळी व ऐतिहासिक किनार लाभली आहे ती म्हणजे त्यांचे प्रशिक्षक दिदियर डेस्चॅम्प यांची कामगिरी. १९९८ साली फ्रान्स जेव्हा पहिल्यांदा जगज्जेता ठरला त्यावेळी डेस्चॅम्प त्या संघातील एक सदस्य होते व यावेळी ते प्रशिक्षक आहेत. अशी कामगिरी बजावणारे ते तिसरे प्रशिक्षक ठरले आहेत. इंग्लंडच्या हॅरी केनने ६ गोलांसह गोल्डन बूटचा पुरस्कार पटकावला.
या अंतिम लढतीत एम्बापे व पॉल पोग्बा यांच्यातील ताळमेळ प्रभावी ठरला. मध्यांतरासाठी खेळ थांबला त्यावेळी फ्रान्सने २-१ अशी आघाडी घेतली होती.
सामन्याच्या १८व्या मिनिटाला फ्रान्सला फ्री कीक मिळाली. त्या फ्री किकच्या बचाव करताना क्रोएशियाच्या मांडझुकिकने स्वयंगोल केला. त्यामुळे फ्रान्सला १-० आघाडी मिळाली होती. मात्र २८ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या इव्हान पेरिसिकने गोल नोंदवित १-१ बरोबरी साधली. त्यानंतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली असता त्यावर ग्रीझमनने गोल नोंदवला.
वर्ल्ड कपच्या अंतिम लढतीत गोल नोंदवणारा किशोरवयीन खेळाडू होण्याचा मान यावेळी किलिन एम्बापे याने (६५व्या मिनिटाला) मिळवला. कित्येक वर्षांपूर्वी अशी किमया ब्राझिलच्या पेलेने साधली होती. एम्बापे व पॉल पोगबा यांनी नोंदवलेले फिल्ड गोल नेत्रदीपक असेच ठरले.
स्पर्धेतील अर्धा डझन गोल
फ्रान्स : १) मारियो मांडझुकिक (१८वे मिनिट), २) आंतोनी ग्रीझमॅन (३८वे मिनिट), ३) पॉल पोगबा (५९वे मिनिट), ४) किलिन एम्बापे (६५वे मिनिट).
क्रोएशिया : १) इव्हान पेरिसिक (२८वे मिनिट), २) मारिओ मांडझुकिक (स्वयंगोल).