आयएसआयएसला सामील होण्याच्या इराद्याने सौदी अरेबियामार्गे इराकला जाऊ पाहणार्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याला नुकतीच अटक झाली आणि नंतर त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. ‘गुगल’सारख्या महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर कंपनीचा तो कर्मचारी होता. जिहादी दहशतवादाची पाळेमुळे कुठवर रुजत चालली आहेत याचा हा धक्कादायक दाखला आहे. अशा प्रकारचा उच्चशिक्षित तरूण अशा गोष्टींत अडकण्याची ही काही पहिलीच घटना नव्हे. आजवर असे अनेक उच्चशिक्षित तरूण जिहादी दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यातील अनेकांनी प्रत्यक्ष दहशतवादी कटकारस्थान रचण्यात भागही घेतला. धर्मवेड किती पराकोटीला जाऊ शकते आणि त्यातून सारासार विवेकबुद्धी कशी नष्ट होऊ शकते हे अशा घटनांतून कळून चुकते. या मार्गाचा शेवट हा फक्त मृत्यू किंवा कैद हाच आहे हे ठाऊक असूनही ज्यांचे आयुष्यही अद्याप उभे राहिलेले नाही असे कोवळे तरूण या वाकड्या वाटेने पावले टाकू लागतात याला काय म्हणावे? अशा कोणत्या विषवल्लीची ही फळे आहेत, हा अवघ्या समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपल्या देशात समाजातील धार्मिक सामंजस्य लयाला चालले आहे. कट्टरतावादी शक्ती दिवसेंदिवस मुजोर होत चालल्या आहेत आणि केवळ राजकीय कारणांसाठी राजकारणीही अशा शक्तींची पाठराखण करू लागले आहेत. अल्पसंख्यकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या तापल्या तव्यावर आजवर राजकारण्यांनी आपल्या मतांच्या पोळ्या भाजल्या. आता जिहादी दहशतवादीही याच तव्यावर आपले कारनामे तडीस नेऊ पाहात आहेत. अद्ययावत, प्रगत तंत्रज्ञान अवगत असलेले तरूण जेव्हा अशा धर्मवेड्यांना जाऊन मिळतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारा धोका अनेक पटींनी मोठा असतो हे सांगण्याची आवश्यकता नसावी. त्यामुळे असे उच्चविद्याविभूषित तरूण या वाकड्या वाटा का चोखाळतात याचा गांभीर्याने विचार होण्याची व त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे. काही काळापूर्वी गोव्यात घातपात घडवण्याचा बेत आखणार्या हुबळीच्या तरूणाला पकडण्यात आले होते, जो तेथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. अभियंते, डॉक्टर, संशोधक, तंत्रज्ञ अशा उच्चशिक्षित तरूणांना जिहादसाठी चिथावून त्यांच्या ज्ञानाचा आणि माहितीचा वापर गैरकृत्यांसाठी करण्याचे जे डावपेच दहशतवादी शक्ती आखत आहेत, त्याचा धोका ओळखला नाही तर भविष्यात बॉम्बस्फोट, गोळीबार यापेक्षा वेगळ्याच प्रकारची आक्रमणे समाजावर होऊ शकतात. जैविक, रासायनिक अस्त्रे, माहिती तंत्रज्ञानाधारित सायबर हल्ले आदींनी आज दहशतवादाला नव्या मिती दिलेल्या आहेत आणि त्याही स्फोट किंवा घातपाताएवढ्याच घातक आहेत. जगभरातील जिहादी माथेफिरूंना आयएसआयएसच्या रूपाने हक्काचा आसरा मिळाला आहे हीदेखील अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्यातून संघटित आणि सुनियोजित हल्ल्यांना जगाला तोंड द्यावे लागू शकते. अल कायदाने अलीकडेच भारतात आपली शाखा स्थापन केल्याची घोषणा केली. आता बंगालमध्ये आपली खिलाफत स्थापन करणार असल्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. आसाममध्ये बोडोंच्या हिंसाचारातून दुखावलेल्या तेथील मुसलमान समाजामध्ये फुटिरतेचे विष पेरले जाते आहे. पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच बॉम्ब बनवण्याचा जणू कारखानाच आढळून आला. बांगलादेशमधून भारतात घुसखोरी करून घातपाती कारवाया करण्याचे प्रकार तर पूर्वीपासून चालत आलेले आहेत. दक्षिण भारतामध्ये तर दहशतवादाची पाळेमुळे केव्हाच पसरलेली आहेत. दुसरीकडे मंगळुरूसारख्या ठिकाणी धार्मिक असहिष्णुतेच्या ज्या घटना वारंवार घडत आहेत, त्याही जिहादी शक्तींच्या पथ्थ्यावरच पडत आहेत. उत्तरेला बिहार, उत्तर प्रदेशमधील काही जिल्हे हे तर दहशतवाद्यांचे आसरेच बनलेले आहेत. आयएसआयएसला जाऊन मिळू पाहणार्या महाराष्ट्रातील तरूणांची संख्याही मोठी आहे. आजवर काहींना त्यासंदर्भात अटक झाली आणि काहीजण तर जाऊन मिळालेसुद्धा. ही सगळी परिस्थिती पाहिली तर आपला देश एका ज्वालामुखीच्या तोंडावर आज उभा आहे याची साक्ष पटते. अशा वेळी उच्चशिक्षित जिहादींची साथ या राष्ट्रद्रोह्यांना मिळणे ही बाब विलक्षण गंभीर आणि चिंताजनकच आहे.