>> पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्याचा कॉंग्रेसला सल्ला
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल फेटाळून लावला. कॉंग्रेसने फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करावी, असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी दिला.
गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकारकडून स्वत:सह दिगंबर कामत, मायकल लोबो, मोरेन रिबिलो व अन्य कॉंग्रेस नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप गुरुवारी केला होता. तसेच सरकारी अधिकार्यांना हाताशी धरून हे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला होता. त्याला काल मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
कॉंग्रेस पक्षाने निवडणूक निकालापूर्वी पराभव मान्य केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे भाजपवर फोन टॅपिंगचा बिनबुडाचा आरोप करीत आहे. फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय असल्यास कॉंग्रेस नेत्यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार करावी. विनाकारण बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कॉंग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही. त्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही नाटके केली जात आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून, पुढील सरकार भाजपचेच येईल, असा दावाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.
निकालापूर्वीच कॉंग्रेसला आपल्या डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे फोन टॅपिंगसारखे खोटे आरोप गिरीश चोडणकर करू लागले आहेत. तसेच संशय असल्यास पोलीस महासंचालकांकडे तक्रार करावी.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
म्हादईवरील जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध केंद्राकडे हरकत
कर्नाटकने म्हादई नदीच्या पाण्याचा वापर करून जो जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्पाविरुद्ध गोवा सरकारने केंद्र सरकारकडे हरकत नोंदवली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.
आपण स्वत: या जलविद्युत प्रकल्पविषयक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही या प्रकल्पाला आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पासाठी म्हादई जलतंटा लवादाकडून कर्नाटकने परवानगी घ्यायला हवी होती. लवादाकडून त्यांना या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी मिळणार नाही, याची आम्हाला खात्री आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.