पालिकेने बाजाराची वाट अडवल्याचा आरोप
सोपोकरावरून फोंडा मार्केट व्यापारी संघटना व फोंडश नगरपालिका मंडळ यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. परवा मध्य रात्रीच्या सुमारास पालिकेने एका दुकानाची भिंत पाडल्याने बाजारात जायची वाट बंद झाली. व्यापार्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत एकत्र येऊन रास्तारोको केले. काल ऐन बाजाराच्या दिवशी लोकांची मात्र यामुळे प्रचंड गैरसोय झाली. व्यापार्यांनी रस्ता अडवल्यानंतर दोन तास वाहतूक बंद झाली होती.
विक्रेते संघटनेचे अध्यक्ष किशोर मामलेकर यांच्या म्हणण्यानुसार पालिकेने मध्यरात्री इमारत पाडली व बाजारपेठेत जाणारा मुख्य रस्ता माती घालून बंद केला, जेणेकरून ग्राहकांना व व्यापार्यांना आत जाणे कठीण व्हावे. शनिवार हा बाजाराचा दिवस असल्याने विक्रेत्यांचा व्यापार बर्यापैकी होतो. सोपो संदर्भात पुकारलेल्या आंदोलनाचा राग काढण्याकरीता पालिकेने जाणून बुजून हे कृत्य केले आहे.
नगरसेवक दादा उर्फ व्यंकटेश नाईक यांच्या म्हणण्यानुसार लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इमारत पाडण्याचे काम रात्री उरकण्यात येत होते. सकाळी वाटेवरील माती काढण्याचे काम चालू होते. परंतु पालिकेविरुध्दचा राग व्यक्त करण्यासाठीच विक्रेत्यानी संपूर्ण बाजारपेठ वेठीस धरली.
सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत सगळे विक्रेते रस्त्यावर बसल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला. वाट बंद केलेल्या पालिकेच्या अधिकार्यांवर कारवाई होईपर्यंत विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडून बसणे पसंद केले. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एल्. पाटील यांच्या कारवाई संदर्भातच्या आश्वासनानंतर विक्रेते मागे हटले.