फोंड्यात भीषण अपघातात ३ ठार

0
126

कुर्टी-फोंडा येथील बगल रस्त्यावर बुधवारी रात्री दोन दुचाक्यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाले. ठार झालेल्यांत रमेश बेल्लाद (५०, कुर्टी-मुळ बेळगाव), शाहीद सय्यद (१९, नागझर कुर्टी) व तुकाराम इंगळे (३७, पंडीतवाडा, फोंडा) यांचा समावेश आहे. सदर अपघात रात्री १०.३० च्या सुमारास घडला. अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बेल्लाद व तुकाराम इंगळे हे दोघे जीए – ०५ – के – २७३४ क्रमांकांची ऍक्टिवा स्कूटर घेऊन खांडेपारहून कुर्टी बायपासने फर्मागुडीच्या दिशेने जात होते. तर शाहीद सय्यद पल्सर मोटारसायकलवरून विरुद्ध दिशेने येत होता. हाऊसिंग बोर्ड परिसरात सरळ रस्त्यावर दोन्ही दुचाक्या पोहचताच स्कूटरची जोरदार धडक विरुद्ध दिशेने येणार्‍या जीए – ०५ – एम – ४०३८ क्रमांकाच्या पल्सरला बसली. जोरदार टक्कर झाल्याने रमेश बेल्लाद हे जागीच ठार झाले तर शाहीद सय्यद व तुकाराम इंगळे या दोघा जणांना गंभीर अवस्थेत फोंडा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्यांपैकी तुकाराम इंगळे याचे जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले. तर शाहीद याचे गोमेकॉ, बांबोळी येथे नेण्यात येत असताना वाटेत निधन झाले.

स्कूटर चुकीच्या दिशेने आल्याने हा भीषण अपघात घडला. फोंडा पोलिसांनी स्कूटरचालक रमेश बेल्लाद यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी भा. दं. सं. ३७९ आणि ३०४ (अ) खाली गुन्हा नोंदविला आहे. या अपघातात स्कूटरचालकाने सुसाट दुचाकी हाकत चुकीच्या दिशेने पल्सरला धडक दिल्याने पोलिसांनी सांगितले. निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी अपघाताचा पंचनामा केला.

पर्वरीत स्कूटरचालक ठार
पर्वरी महामार्गावरील नेक्सा शोरूमसमोर एका अज्ञात स्विफ्ट कारने म्हापसाहून पणजीच्या दिशेने जाणार्‍या स्कूटरला जोरदार धडक दिल्याने स्कूटरचालक दीपक यशवंत घारसे (६०) यांचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली त्यांची पत्नी जखमी झाली आहे. बुधवारी रात्री पावणेआठ वाजता हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरीतील घारसे दाम्पत्य जीए – ०३ – सी – २८२० क्रमांकाच्या एक्टिवा स्कूटरने म्हापसाहून पर्वरीला येत असताना नेक्सा शोरूमसमोर मागून भरधाव येणार्‍या स्विफ्ट कारने त्यांना जोराची धडक दिली. त्यात स्कूटरचालक दीपक यशवंत घारसे आणि त्यांची पत्नी दीपाली घारसे हे दोघेही जखमी झाले. दीपक यांना गंभीर अवस्थेत १०८ रुग्णवाहिकेने गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी दीपाली यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
पोलिसांनी अज्ञात कारचालकावर भा. दं. सं. २७९, ३३७, ३०४ (ए ) आणि १३४ (अ) व (ब) कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे.