फोंडा मार्केट व्यापारी संघटनेने आपली मागणी सातत्याने लावून धरल्याने फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी पालिका निरीक्षक व कर्मचार्यांना आदेश देऊन काल ५० च्या वर पदपथावरील बेकायदा व्यापार विक्रेत्यांना हटविले.
व्यापारी संघटना व पालिका मंडळ यांच्यात पालिकेच्या ठेकेदाराकडून वाढीव दराने कर वसूल केला असल्याच्या प्रश्नावरून गेले वर्षभर वाद चालू आहे. पदपथ अडवून बेकायदा मालाची विक्री करणार्या व्यापार्यांकडून पालिकेचा ठेकेदार वाढीव दराने सोपा कर वसूल करतो. त्यामुळे मार्केटमध्ये बसून मालाची विक्री करणार्या व्यापार्यांना नुकसान सोसावे लागते. शिवाय पदपथ अडवल्याने ग्राहक व लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.संघटनेच्यावतीने परवा व काल पालिकेवर मोर्चा नेल्याने कालची तात्पुरती कारवाई केल्याचे संघटनेने म्हटले आहे. सत्तारूढ गटाचे नगरसेवक तथा मार्केट समितीचे अध्यक्ष व्यंकटेश उर्फ दादा अनंत नाईक यांच्याविरुध्द काल मोर्चात सहभागी झालेली सीता नाईक या महिलेने फोंडा पोलिसात तक्रार नोंदवली आहे. व्यंकटेश नाईक यांनी अपशब्द वापरले व आपल्या हातातवर पाय ठेवल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. फोंडा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून तक्रार नोंदवून घेतली आहे. आपण आपल्या प्रभागलातील एका व्यक्तीचे काम करण्यासाठी घेऊन पालिका कार्यालयात जात असतेवेळी त्या महिलेच्या हातावर चुकून पाय पडला असावा, आपण मुद्दाम कृत्य केले नाही असे नाईक यांचे म्हणणे आहे. विरोधक मुद्दाम या प्रश्नाला राजकीय वळण देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.