>> उद्या होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज
फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता काल झाली आहे. उद्या शुक्रवार 5 मे 2023 रोजी सकाळी 8 ते 5 यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीच्या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. सरकारी यंत्रणा या निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
या दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील जाहीर प्रचाराला 20 एप्रिलपासून प्रारंभ झाला होता. फोंडा नगरपालिका क्षेत्रातील 15 पैकी 13 प्रभागांत निवडणूक होत आहे. तर, साखळी नगरपालिकेच्या 12 पैकी 10 प्रभागांत निवडणूक होत आहे. दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रत्येकी 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला. या दोन्ही नगरपालिका क्षेत्रांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. दोन्ही नगरपालिकांच्या मंडळांवर सत्ता मिळविण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक होणाऱ्या नगरपालिका क्षेत्रात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. दोन्ही नगरपालिका क्षेत्रात वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील मद्यालये, बार ॲण्ड रेस्टॉरंट बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. बार ॲण्ड रेस्टॉरंटचा परवाना असलेले दुकानदार केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवू शकतात. त्यांना मद्यविक्री बंद असल्याचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.