फोंडा व धारबांदोडयात मतदान शांततेत

0
4

लोकसभा निवडणुकीत फोंडा व धारबांदोडा तालुक्यात सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पाडले. शिरोडा 75.90, फोंडा – 75.64 , मडकई – 75.73, प्रियोळ – 75.50 व सावर्डे मतदारसंघात 75.29 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरोडा येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने सुमारे अर्ध्या तासानंतर मतदानाला सुरूवात झाली. तर फोंडा येथील काँग्रेस नेत्याने भाजपला पाठिंबा दिल्याचा संदेश वायरल केल्या प्रकरणी प्रीतम हरमलकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फोंडा व धारबांदोडा तालुक्यात सकाळपासून मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा दिसून आल्या. कित्येक मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान झाले. पाडलवाडा – बेतोडा येथील मतदान केंद्रावर सकाळ पासून गर्दी होती. सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वाजे, शिरोडा येथील 23 क्रमांक मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी ईव्हीएम मशीन सुरू झाले नसल्याने मतदारांना अंदाजे अर्धा तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली. अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनची दुरुस्ती करून सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे सकाळी अर्धा तास मतदान सुरू करण्यात उशीर झाला. त्यानंतर मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पाडले.

फोंडा येथील काँग्रेस नेते म्हणून कार्यरत असलेले युवा उद्योजक राजेश वेरेकर यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा खोटा संदेश वायरल केल्या प्रकरणी प्रीतम हरमलकर यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. फोंडा पोलीस या प्रकरणी चौकशी करीत असून गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बांदोडा येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मगो व भाजप यांच्या युतीचा लाभ भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांना होणार आहे. मडकई मतदार संघातून अधिक प्रमाणात मते देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.