कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी मासळीतील फॉर्मेलीनच्या प्रश्नावरून गेले दोन दिवस विधानसभेत घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. मासळीतील फॉर्मेलीन हा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नावर प्राधान्यक्रमाने चर्चा झाली पाहिजे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितले.
राज्यात फॉर्मेलीनयुक्त मासळी आयात करणार्या मासळी एजंटावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष डिसोझा यांनी केली.
मडगाव घाऊक मासळी मार्केटमध्ये परराज्यातून आणण्यात येणार्या मासळीमध्ये फॉर्मेलीन रसायन असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांत घबराट पसरली. राज्यातील नागरिकांच्या जीवनाशी खेळणार्या मासळी एजंटावर कडक कारवाई करावी, असेही डिसोझा यांनी सांगितले.
सीआरझेड अधिसूचनेला विरोध
स्थानिक मच्छीमार मासळीमध्ये रसायनाचा वापर करीत नाही. सरकारने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच मासळी व्यतिरिक्त फळे, भाजी यांच्यात रसायनाचा वापर केला जात आहे. याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सीआरझेड २०१८ च्या अधिसूचनेला विरोध आहे. ही नवीन अधिसूचना जारी करताना पारंपरिक मच्छीमारांना विश्वासात घेतले नाही. किनारी भागात बड्या व्यावसायिकांना जमिनी खरेदी केलेल्या आहेत.