फॉर्मेलीनच्या प्रश्नावरून विरोधी कॉंग्रेस आमदारांनी काल सलग दुसर्या दिवशीही विधानसभेत गदारोळ माजवल्याने सभापती प्रमोद सावंत यांना कालही विधानसभेचे कामकाज पूर्ण दिवस तहकूब करावे लागले. कॉंग्रेस आमदारांनी कालही फॉर्मेलीन प्रकरणी आपण पहिल्या दिवशी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापतीनी चर्चेस घ्यावा अशी मागणी विधानसभेचे कामकाज सुरू होताच केली. मात्र, सभापतीनी ती मागणी मान्य करण्यास नकार देऊन प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधी आमदारानी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन एकच गदारोळ माजवला. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज थेट दुपारी २.३० वा.पर्यंत तहकूब केले. २.३० वा. कामकाज सुरू होताच सकाळचीच पुनरावृत्ती झाल्याने कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
काल सकाळी ११.३० वा. सभापतीनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला असता विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यानी सभापतींना कॉंग्रेसने गुरुवारी फॉर्मेलीन प्रकरणी मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेस घ्यावा अशी मागणी केली. कवळेकर म्हणाले, आम्ही कालही तुम्हाला सांगितले होते की स्थगन प्रस्तावावर प्रथम चर्चा करावी. पण काल तुम्ही आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. निदान आज तरी तो प्रस्ताव चर्चेस घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
जनतेच्या आरोग्यासाठी
चर्चा व्हावी : कवळेकर
यावर कालचा स्थगन प्रस्ताव आज चर्चेस घेता येत नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले. त्यावर कवळेकर म्हणाले की तुम्ही सभापती आहात. सगळे काही तुमच्याच अखत्यारीत आहे. तुम्ही तो चर्चेस घेऊ शकता. पण सावंत यांनी सभागृहाच्या नियमानुसार तसे करता येत नसल्याचे सांगितले. यावर कवळेकर म्हणाले की हा १६ आमदारांचा प्रश्न नाही. तर तो गोव्यातील १५ लाख गोमंतकीयांच्या आरोग्यासंबंधीचा प्रश्न आहे. जेव्हा गोव्यातील एखादा राजकीय नेता आजारी पडतो तेव्हा गोव्यातील सगळी जनता तो बरा व्हावा यासाठी देवाची प्रार्थना करतात. आता त्याच जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले असताना त्या प्रश्नावर आम्ही चर्चा करायला नको काय असा प्रश्न कवळेकर यानी सभापतीना केला. गुरुवारचा स्थगन प्रस्ताव प्रथम चर्चेस घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले.
मात्र, सभापतीनी सदर प्रस्ताव चर्चेस घेण्यास नकार दिला व सभापतीनी मागणी मान्य करण्यास नकार दिल्याने आमदार लुईझिन फालेरो, रवी नाईक, फ्रान्सिस सिल्वेरा आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, क्लाफासियो डायस आदीनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्याही परिस्थितीत सभापतींनी आमदार राजेश पाटणेकर यांना त्यांचा प्रश्न विचारण्याची सूचना केली. पाटणेकर यानी यावेळी गोंधळाच्या वातावरणातच आपला प्रश्न विचारला. मात्र, ह्यावेळी विरोधी आमदारांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घालण्यास सुरवात केल्यानंतर सभापतींनी दुपारी २.३० वा.पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
कवळेकरांकडून ‘त्या’ मासळीबाबत
सभागृहात प्रश्नांचा भडीमार
मात्र, तत्पूवीं सभापतींवर प्रश्नांची सरबत्ती करताना बाबू कवळेकर यांनी फॉर्मेलीनच्या प्रश्नावरून मासळीचे जे १७-१८ ट्रक ताब्यात घेण्यात आले होते ते जप्त का करण्यात आले नाहीत. ते ट्रक कुठे गेले व सध्या कुठे आहेत. त्या ट्रकांत असलेल्या मासळीचे काय झाले. ती मासळी नष्ट करण्यात आली की परत गुपचूप मासळी बाजारात पाठवण्यात आली ते लोकांना कळायला हवे, अशी मागणी केली. मात्र, ह्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर देणे सभापतींनी टाळले.
दुपारचे सत्र आटोपले
केवळ ५ मिनिटांत
विधानसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजता सुरू झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी मासळीतील ङ्गॉर्मेलीनच्या प्रश्नावर चर्चेचा विषय पुन्हा लावून धरल्याने कामकाजात व्यत्यय येऊ लागल्याने सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहाचे कामकाज सोमवार २३ जुलै सकाळी ११.३० पर्यत तहकूब केले. दुपारच्या सत्रात केवळ पाच मिनिटांमध्ये गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
सभागृहाचा खासगी कामकाजाचा दिवस असल्याने सभापती डॉ. सावंत यांनी आमदार प्रवीण झांट्ये यांना खासगी ठराव मांडण्याची सूचना केली. याच वेळी कॉंग्रेस पक्षाचे आमदार मासळीतील फॉर्मेलीनच्या प्रश्नावर चर्चेची मागणी करीत होते. आमदार झांट्ये गोंधळामध्ये ठराव मांडला. आमदार पाटणेकर यांनी गोंधळातच या ठरावाला अनुमोदन दिले. सभापती डॉ. सावंत यांच्याकडून कॉंग्रेसच्या आमदारांना कामकाजात व्यत्यय आणू नका, अशी वारंवार सूचना केली जात होती. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणू नका असे कॉंग्रेसच्या आमदारांना आवाहन केले होते.
सभापती डॉ. सावंत कॉंग्रेस आमदारांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने कॉंग्रेस पक्षाचे सर्व आमदार सभापतीच्या समोरील मोकळ्या जागेत एकत्र आल्याने सभापती डॉ. सावंत यांनी सभागृहाचे कामकाज सोमवार २३ जुलै सकाळी ११.३० पर्यत तहकूब केले.