नदी परिवहन खात्याने राज्यातील फेरीबोट शुल्कामध्ये जी दरवाढ केलेली आहे त्याविरोधात सुरू करण्यात आलेले आंदोलन काल रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या दरवाढीविरोधात काल काँग्रेस पक्षाने जुने गोवे येथील फेरी धक्क्याजवळ आंदोलन केले आणि ही तिकीट दरवाढ मागे न घेतल्यास यापेक्षा मोठे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.
दरम्यान, काल आम आदमी पक्षाने या फेरीबोट तिकीट दरवाढी विरोधात राशोल येथे फेरीबोट धक्क्यावर आंदोलन केले. या फेरीबोट दरवाढीविरोधात शनिवारी रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने रायबंदर येथील फेरीबोट धक्क्याकडे आंदोलन सुरू करून त्या दरवाढीचा निषेध केला होता. आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले होते. फेरोबोटतून प्रवाशासाठी प्रती फेरी दुचाकींना 10 रुपये तर मासिक पास 150 रुपये तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रती फेरी 40 रुपये व मासिक पास 600 रुपये असे हे दर वाढवण्यात आले आहेत.