फेरीबोटसाठी आजपासून नवीन शुल्क

0
6

>> दुचाकींना वगळले, जुन्या दरवाढीचा आदेश मागे

राज्य सरकारच्या नदी परिवहन खात्याने फेरीबोटमधून वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जाहीर केलेले शुल्क मागे घेणारी सूचना काल जारी केली असून फेरीबोट सेवेसाठी नवीन शुल्क जाहीर करण्यात आले असून दुचाकी वाहनांना शुल्कातून वगळण्यात आले आहे. फेरीबोट सेवेसाठी नव्याने जारी केलेले शुल्क आज गुरुवार 16 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

नदी परिवाहन खात्याने यासंबंधीची आदेश काल जारी केला आहे. नदी परिवहन खात्याने राज्यातील विविध जलमार्गावरील फेरीबोट सेवेसाठी नवीन शुल्क जारी केले होते. तसेच, दुचाकींना शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. मात्र दुचाकींना शुल्क आकारणीच्या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. तसेच, इतर वाहनांच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेरीबोट सेवेच्या वाहन शुल्कातून दुचाकी वाहने वगळण्यावर विचार करण्याची घोषणा हॅलो गोंयकार या थेट संवाद कार्यक्रमात बोलताना केली होती.

नदी परिवहन खात्याने जाहीर केलेल्या नवीन सूचनेनुसार पोंबुर्फा – चोडण, ओल्ड गोवा, कामुर्ली- तुये, नार्वे- दिवाडी, कुंभारजुवा-गवंडाळी आदी जलमार्गावर तीन चाकी आणि चारचाकी वाहनांसाठी प्रत्येक फेरीसाठी 7 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर, 315 रुपयांमध्ये महिन्याचा पास घेऊन कितीही फेऱ्या मारल्या जाऊ शकता. मध्यम व्यावसायिक वाहनांसाठी 15 रुपये, अवजड वाहनांसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच कार्गोसाठी प्रतिटन 20 रुपये आकारले जाणार आहेत.
वळवई -सुर्ल-मायणा, पणजी-बेती, धावजी, केरी- तेरेखोल, रायबंदर-चोडण, सापेंद्र- दिवाडी, सारमानस-टोक, राय-शिरोडा, आडपई-रासई आदी जलमार्गावर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी प्रति फेरी 10 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या जलमार्गावर मासिक पासची किंमत 450 रुपये एवढी आहे. मध्यम व्यावसायिक वाहनाला 20, अवजड वाहनाला 22 तसेच, कार्गोसाठी प्रतिटन 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.