स्वित्झर्लंडचा अव्वल मानांकित रॉजर फेडरर व स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदाल यांनी काल सोमवारी विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फेडररने फ्रान्सच्या २२व्या मानांकित ऍड्रियन मन्नारिनो याचा सरळ तीन सेटमध्ये ६-०,७-५,६-४ असा पराभव केला तर नदालने झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याला ६-३, ६-३, ६-४ असे पाणी पाजले.
उपांत्यपूर्व फेरीत फेडररचा सामना द. आफ्रिकेच्या केविन अँडरसन याच्याशी होणार आहे. जपानच्या २६व्या मानांकित केई निशिकोरी याने तीन तास २८ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत लाटवियाच्या अर्नेस्ट गुलबिस याला ४-६, ७-६, ७-६, ६-१ असे हरवून नवव्या मानांकित जॉन इस्नर याच्याशी ‘अंतिम ८’मधील गाठ पक्की केली. अमेरिकेच्या इस्नरने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपास याला ६-४, ७-६, ७-६ असे हरविले. महिला एकेरीत ‘टॉप १०’मधील शेवटची खेळाडू असलेल्या सातव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिचे आव्हान काल आटोपले. तिला नेदरलँड्सच्या किकी बर्टेन्सने ६-३, ७-६ अशी धूळ चारली.
महिलांच्या उपांत्य फेरीत डॉमनिका सिबुलकोवा (स्लोवाकिया) वि. येलेना ओस्टापेंको (लाटविया), दारिया कसातकिना (रशिया) वि. अँजेलिक कर्बर (जर्मनी), किकी बर्टेन्स (नेदरलँड्स) वि. ज्युलिया जॉर्जेस (जर्मनी) व सेरेना विल्यम्स (अमेरिका) वि. कामिला जॉर्जी (इटली) असे सामने रंगणार आहेत.