>> डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेल्या पहिल्या अपात्रता याचिकेवर सभापतींचा निवाडा; दुसऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू
सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या विरोधात डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका दोन वर्षांनंतर काल सुनावणीअंती सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली. त्यामुळे 8 फुटीर आमदारांना मोठा दिलासा मिळाला. पहिली याचिका निकाली काढल्यानंतर आता सभापतींनी दुसरी याचिका सुनावणीला घेतली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी फुटीर आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीला सभापतींनी कालपासून सुरुवात केली. दरम्यान, गोवा काँग्रेसने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर अद्यापही सुनावणी झालेली नाही, त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानंतर आठ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकांवरील सुनावणीला गती प्राप्त झाली आहे. काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, रुडाल्फ फर्नांडिस, केदार नाईक, राजेश फळदेसाई यांच्याविरोधात डॉम्निक नोरोन्हा यांनी सर्वात आधी सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली होती.
सभापतींनी नोरोन्हा यांच्या याचिकेवर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करून निवाडा राखीव ठेवला होता. सभापती तवडकर यांनी नोरोन्हा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दोन वर्षांनी निवाडा काल जाहीर केला. या निवाड्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांना दिलासा मिळाला आहे.
अमित पाटकरांकडून
निवाड्याबाबत नाराजी व्यक्त
सभापती रमेश तवडकर यांनी आठ आमदारांच्याविरोधातील अपात्रता याचिकेवरील जाहीर केलेल्या निवाड्याबाबत गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आठ आमदार अपात्रता प्रकरणी गोवा काँग्रेसची याचिका अजूनपर्यंत प्रलंबित ठेवून सभापतींनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, असेही पाटकर यांनी म्हटले आहे.
याचिका फेटाळण्याचे कारण निवाड्यात नमूद
आमदार अपात्रता प्रकरणी एकूण तीन याचिका वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखल केल्या आहेत. त्यातील डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन फेटाळून लावली आहे. या याचिकेवरील निवाड्यामध्ये ती याचिका का फेटाळून लावली, याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
>> नोरोन्हा यांची अपात्रता याचिका फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर सभापतींनी सुनावणीला सुरुवात केली.
>> काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुमारे 2 वर्षांनी पहिली सुनावणी काल घेण्यात आली.
>> काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 8 आमदारांना उत्तर दाखल करण्यासाठी 18 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पुन्हाउत्तर दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या 24 आणि 25 ऑक्टोबरला पुढील सुनावणी घेतली जाणार आहे, अशी माहिती याचिकादार चोडणकर यांचे वकील अभिजीत गोसावी यांनी दिली.