फुकटेगिरी

0
143

अमुक एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू ‘फ्री’ अशी जाहिरात दिसली की आपली पावलं त्या दिशेनं वळायलाच हवीत. ‘फुकट’ या शब्दातच जादू असते, जिचा पगडा म्हणा वा पकड आपल्या सुपीक मेंदूवर पडतेच आणि मग फुकटातली वस्तू पदरात पाडून घेण्याकरिता नको त्या वस्तूची खरेदी आपल्याकडून झालीच म्हणून समजा!

‘फुकट’ या शब्दाचे आकर्षण नसलेला माणूस हातात दिवा घेऊन शोधायला गेला तरी आढळणे कठीणच म्हणायला हवे. तुम्हा-आम्हा सर्वांनाच एखादी वस्तू फुकटात मिळाली तर ती हवीच असते- मग ती गरजेची असो वा बिनगरजेची- हे एक त्रिवार सत्यच म्हणायला हवं. बिनगरजेच्या तर सोडाच, पण आत्यंतिक गरजेच्या खरेदीच्या वेळी आपल्याला आपल्या खिशात हात घालायला आवडतच नाही. आपल्याला सगळं सगळं फुकटात हवं असतं. पण ते मिळायचं कसं? त्यासाठी डोकं थोडं झिजवावं लागतं.
घरापासून एखाद्या गरजेच्या विशिष्ट स्थळी जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास फुकटात झाला तर आपल्याला आनंदच होतो. त्याकरिता रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांच्या मालकाचं लक्ष आपल्याकडं वेधण्यासाठी आपण त्याला आपला हलणारा अंगठा दाखवत असतो. अर्थात अंंगठा हलवून दाखवला म्हणून कुणी तुम्हाला ‘लिफ्ट’ देणार नाही. पण अजिबात न कंटाळता दहा वाहनचालकांना अंगठा दाखवायला घेतला तर त्यातला एखादा तरी फशी पडतोच! आणि मग काय… पुढच्या फुकट्या प्रवासाचा आनंद घ्यायला आपण मोकळे होतो!
अंगठा दाखवून फुकटा प्रवास पदरी पाडून घ्यायची लाज वाटत असेल तर याहून प्रभावी युक्ती म्हणजे आपल्या नातेवाईकासोबत वा मित्रासोबत प्रवास करायला घेणे. तिकीट काढण्याकरिता कंडक्टर जवळ येऊन ठेपला तरी आपलं जणू त्याच्याकडं लक्षच नाही असं भासवण्यात यशस्वी ठरलात तर झकत आपला शेजारी तिकीट घेतोच! एकदा का त्यानं स्वतःबरोबर आपल्याही तिकिटाचे पैसे दिलेत याची खात्री पटली की लगेच म्हणायचं, ‘‘अरेच्या, तुम्ही माझंही तिकीट काढलंत? हे बरं नाही केलंत भाऊसाहेब तुम्ही… अहो, आम्हालाही तुमचं तिकीट काढायची संधी द्या… ते काही नाही… पुढच्या प्रवासात आजच्यासारखी भेट झाली तर मी तुम्हाला खिशात हात घालायलाच देणार नाही!’’ …आणि मग एवढी सारवासारव करून झाली की सावधगिरी बाळगायची ती एवढीच की, महिन्याभरात त्या भल्या माणसाचा संबंधच येणार नाही अशीच व्यवस्था करायची! कधीकधी रस्त्यातून जाताना एखाद्या हॉटेलातून मस्त वड्याचा सुवास आपल्या नाकपुड्यांशी रुंजी घालत असेल तर तोंडाला सुटणारं पाणी पुसत एवढंच करायचं… आजूबाजूला आपला एखादा नातेवाईक, मित्र, सखा दृष्टीस पडतो की काय ते पाहायचं. आणि समजा तसा तो दिसला रे दिसला की ‘‘ओहोहो, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ… किती वर्षांनी भेटतो आहेस…’’ असं म्हणत त्याला त्या हॉटेलच्या दारातच उभं करून उगाचच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून झाल्या की म्हणायचं, ‘‘चला… आजची आपली अलभ्य भेट साजरी करायलाच हवी. चहा मारूया…’’ आणि त्याच्या बखोटीला धरून त्याला हॉटेलात खेचायचंच… आपल्याला आवडणारी डिश मागवून झाल्यावर ‘तुझ्या आवडीचं तू काहीही घे बाबा’ असं म्हणून समोर ठेवला गेलेला बशीतला पदार्थ पोटात ढकलून झाला की ‘गरमागरम चहा होऊ दे’ असं म्हणत चहाची ऑर्डर ऐकवायची. आणि पोर्‍या बिलाची थाळी आणतो आहे असं पाहताच हात धुण्याच्या निमित्तानं वॉशबेसीनकडं पळ काढला की फुकटची न्याहारी पचलीच म्हणून समजायची! शेवटचं वाक्य म्हणजे, ‘‘अर्रर्र… तू म्हणजे अस्सा आहेस बघ… मला कधीकधी म्हणून खिशात हात घालायची संधी देत नाहीस… बरं… आता भेटू आपण असेच. त्यावेळी मात्र बिल मी देणार म्हणजे देणारच. तुझी अरेरावी सहन नाहीच करणार…’’
फुकटचा प्रवास आणि खाण्यापिण्याप्रमाणंच फुकटच्या इतर वस्तूंचाही मोह आपल्याला आवरत नाही. आपल्या या फुकटेपणाचा फायदा घेणारेही असतात. मुंबईत ‘विठ्ठल भेलपुरी हाऊस’ नावाचं एक हॉटेल आहे. तिथं विविध पदार्थांना पोटात रिचवून आणि बर्‍यापैकी आकड्याचं बिल देऊन ग्राहक बाहेर जायला निघाला की दाराशीच कुरमुरे आणि बारीक शेवाचं एक पातेलं तुमच्यासाठी ठेवलेलं असतं. मुठी भरभरून कुरमुरे घेतले जातात… तोंडात बकाणे भरले जातात… कारण हे सगळं फुकट असतं! पण ज्याला आपण फुकट समजतो त्याचे पैसे आगाऊच वळते करण्यात आलेत ही बाब भल्याभल्यांच्या ध्यानात येत नाही, तिथं तुमच्या-आमच्यासारख्यांचा तो काय पाडाव?
अमुक एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू ‘फ्री’ म्हणजेच फुकटात अशी जाहिरात दिसली की आपली पावलं त्या दिशेनं वळायलाच हवीत. ‘फुकट’ या शब्दातच जादू असते, जिचा पगडा म्हणा वा पकड आपल्या सुपीक मेंदूवर पडतेच आणि मग फुकटातली वस्तू पदरात पाडून घेण्याकरिता नको त्या वस्तूची खरेदी आपल्याकडून झालीच म्हणून समजायची! फुकटातली सन्माननीय गोष्ट म्हणजे आपल्या चिरंजिवाचं लग्न. ‘‘सगळा सगळा खर्च आम्हीच करू… तुम्ही फक्त नियोजित वराला घेऊन नियोजित वेळी आणि स्थळी उपस्थित व्हायचं,’’ अशा शब्दातलं भरघोस आश्‍वासन वधुपित्याकडून ऐकायला मिळालं की आपण जन्माला घातलेल्या चिरंजिवाबरोबर आपल्या घराण्याचंही भलं झालं असं समजायला हरकत नसते…
एकदा का फुकटेगिरीची सवय अंगात शिरली की कर्णाच्या कवचकुंडलाप्रमाणं चिकटलीच म्हणून समजायची. त्यामुळेच असेल कदाचित, पण आपल्याकडं फुकटेगिरीसंबंधीच्या म्हणीही प्रचलित आहेत- ‘फुकट जेऊ तर बापलेक येऊ’ वा ‘फुकटचं खाणं, त्याला स्वस्त-महाग काय घेणं?’ आणि ‘फुकटची वस्तू जास्त दिवस टिकत नाही.’ ही पूर्णसत्य पटवणारी म्हण, ‘फुकाची बाईल, कशाला राहील?’ आपल्या अंगातल्या फुकटेगिरीला खतपाणी घालण्याचं काम सरकारतर्फेही चालताना दिसतं. निवडणुकीचे दिवस जवळ यायला लागले की, उमेदवारातर्फे ‘पिण्या’चे वाटप फुकटात होते. कुठलीही मागणी फुकटात पूर्ण करता येते. उमेदवाराचं म्हणणं एवढंच असतं, ‘हवं ते फुकटात घ्या… तुमचं किमती मत मला द्या!’ आपल्या अंगी मुरलेल्या फुकटेगिरीच्या समर्थनात आपण म्हणून जातो पहा- ‘‘अहो, प्रत्यक्ष दयाघन परमेश्‍वरच आपल्याला जिवंत ठेवणारी हवा फुकटात देतो तिथं इतर वस्तूंचं ते काय घेऊन बसलात! त्यासुद्धा फुकटात मिळायलाच हव्यात असं म्हटलं तर चूक म्हणता येईल काय?’’ आहे का तुमच्यापाशी या प्रश्‍नाचं उत्तर?