(क्षणचित्रं… कणचित्रं…)
- प्रा. रमेश सप्रे
रानातली वाघीण काय किंवा घरातली मांजरी काय, पिल्लाला जखम झाली तर प्रेमाने… हो! वात्सल्यभावनेने ती जखम चाटेल, पण तिच्यावर हळुवार फुंकर मारणार नाही. फुंकर मारतो फक्त माणूसच आणि त्या फुंकरीत जर निष्कपट प्रेम असेल तर तीच असते ‘माणुसकी.’
‘फुंकर’ या शब्दात किंवा कृतीत कोणता क्षण नि कोणता कण… असा विचार तुमच्या मनात येईल. कारण ‘फुंकर’ ही काही डबा, झोपाळा, फुगा, छत्री यांच्यासारखी कणाकणानं बनलेली वस्तू नाही. खरं आहे. पण कृती तरी आहे ना? मग कृती करण्यासाठी किंवा घडण्यासाठी काहीतरी लागतंच ना! फुंकर मारण्याची क्रिया ज्या श्वासावर अवलंबून असते तो श्वास किंवा उच्छ्वास निर्माण करण्यासाठी माणसाचा देह लागतोच ना, जो कणाकणांनी बनलेला असतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की फक्त माणूसच फुंकर मारू शकतो. एखादी रानातली वाघीण काय किंवा घरातली मांजरी काय, पिल्लाला जखम झाली तर प्रेमाने… हो! वात्सल्यभावनेने ती जखम चाटेल, पण तिच्यावर हळुवार फुंकर मारणार नाही. फुंकर मारतो फक्त माणूसच आणि त्या फुंकरीत जर निष्कपट प्रेम असेल तर तीच असते ‘माणुसकी.’ असो.
‘फुंकणे’ या क्रियापदापासून ‘फुंकर’ हे भाववाचक नाम बनलेय. ‘फुंकर’ अनुभवता येते, पण दिसत मात्र नाही. आपण निरनिराळ्या गोष्टी फुंकत असतो. पूर्वीची एखादी श्यामची आई गरिबीमुळे ओली लाकडं चुलीत घालावी लागल्याने दम-धाप लागेपर्यंत फुंकणीतून फुंकत राहायची. धुरामुळे डोळे लाल व्हायचे, पण लाल अग्नी काही पेटायचा नाही. या फुंकरीपासून सोनाराच्या नाजूक फुंकण्यापर्यंत, तरीही ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.’ पण नळीचं फुंकून निर्माण झालेलं वारं इकडून तिकडे नेण्याचंच काम असतं. ती वारं राखून ठेवत नाही. आपण मात्र आप्तवाक्यं (म्हणजे आपल्या हिताचा उपदेश) या कानातून घेतो, दुसऱ्या कानातून बाहेर सोडतो. म्हणजे फुंकणीच की! दोन कानांच्या मध्ये असलेल्या मेंदूत किंवा मनात काहीच टिकत नाही, उतरत नाही. सर्वात वाईट म्हणजे गुरूनं दिलेला कानमंत्र. तोही फुंकलाच जातो की! पण काही थोड्याच लोकांच्या कानातून तो मंत्र मनात प्रवेश करतो नि जीवनात उतरतो. ते जीवन, तो शिष्य आमूलाग्र बदलून जातो. जसा वाल्याचा वाल्मीकी.
आपण तुतारीही (बिगुल) फुंकतो. जागृती आणण्यासाठी. प्रेरणा देण्यासाठी. मंगलप्रसंगी आनंद व्यक्त करण्यासाठी शिंगही फुंकलं जातं. महाभारत युद्धाचा आरंभ भीष्मपितामहांच्या उत्साही शंखनादानं नि त्यानंतरच्या कौरव वीरांच्या उन्मादी शंखध्वनीनं झाला नाही तर भगवान श्रीकृष्णाच्या पाचजन्म शंखनादानं नि त्यानंतर दीर्घकाळ एकामागून एक झालेल्या पांडववीरांच्या शंखघोषानं! इथं सर्वांनी शंखच फुंकलेयत पण त्यामागील उद्देश निराळा आहे. व्यवहारात अगदी तामस फुंकण्याचा प्रकार म्हणजे विडी किंवा सिगरेट फुंकण्याचा. एखादा श्रीमंत माणूस किंवा माफिया खलनायक मोठा सिगार ओढताना दाखवला जातो. पण शेवटी तेही असतं एक फुंकणंच. ज्यामुळे खरं फुंकलं जात असतं जीवन. फक्त स्वप्नांचा धूर नि जीवनाची राख. दुसरं काय?
यासंदर्भात तीन शिष्यांची गोष्ट फार मार्मिक आहे. एका अधिकारी गुरूच्या आश्रमात राहून ते वेगवेगळ्या विद्या शिकतात. आपल्या घराकडे जाताना वाटेतील रानात त्यांना सुटी होऊन पसरलेली हाडं दिसतात. एक शिष्य म्हणतो ‘मी गुरूनं शिकवलेला प्रयोग करतो. तो ती सारी हाडं जोडून एक सांगाडा बनवतो. तसा बनवल्यावर तो एका वाघाचा सांगाडा बनतो. यावर दुसरा म्हणतो, माझी विद्या वापरून मी या सांगाड्यावर मांस, रक्त, त्वचा निर्माण करतो. त्याप्रमाणे केल्यावर तो सांगाडा वाघासारखा दिसतो, पण निर्जीव असतो. यावर तिसरा म्हणतो, मी या वाघात प्राण फुंकून त्याला जिवंत करू शकतो. यावर दुसरे दोघेजण म्हणतात, ‘तो प्रयोग नको.’ पण तिसरा शिष्य मात्र हट्टानं मंत्र म्हणून त्या वाघात प्राण फुंकतो. तो जिवंत झालेला वाघ त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाकतो. इथेही मंत्रसिद्ध फुंकरच आहे. पण मूर्खपणानं घातलेली आत्मघातकी फुंकर!
एक ऋषितुल्य सद्गुरू आपल्या प्रिय शिष्याच्या त्याच्या साधनेचा मंत्र फुंकून म्हणतात, ‘हा मंत्र मी फक्त तुलाच दिलाय. याला गुप्त ठेवून, खूप मंत्रसाधना करून माझ्यासारखा बन.’ शिष्य अत्यंत आनंदात घराच्या वाटेवर असताना रस्त्यात समोरून येणारा प्रवासी हसून म्हणतो, ‘राम राम.’ पुढे साधूचा एक गट ‘श्रीराम जयराम जय जय राम’ असा रामाचा त्रिवार जयजयकार असलेला मंत्र म्हणत जात असतो. इतक्यात समोरच्या दिशेनं एक प्रेतयात्रा येते. सर्वजण म्हणत असतात- ‘रामनाम सत्य आहे!’ त्या शिष्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो. कारण त्याला गुरूनं फक्त दोन अक्षरी ‘राम’ एवढाच मंत्र दिलेला असतो. परत येऊन गुरूंना याचं कारण विचारल्यावर गुरू त्याच्या हातात एक काचेचा गोळा देऊन सांगतो, ‘बाजारात जाऊन तीनचार निरनिराळ्या दुकानांत काचेच्या या गोळ्याच्या किमतीची चौकशी कर. तो विकायचा नाही, फक्त किंमत विचारायचीय.’ त्याप्रमाणे भाजीवाली त्याची किंमत एक शेर कांदे एवढी करते, तर सोनार (शेटी) एक हजार रुपये सांगतो. जवाहिऱ्याकडे तो गोळा दाखवल्यावर त्याची नीट पारख करून तो म्हणतो, ‘हा काचेचा गोळा नसून एक अमूल्य हिरा आहे- त्याला पैलू मात्र पाडायला हवेत!’ शिष्य गुरूकडे परतल्यावर गुरू उद्गारतो, ‘मी तुझ्यावर फुंकलेला ‘राम’ हा मंत्र त्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे. त्या मंत्राचा सतत जप करून त्याला स्पंदनांचे पैलू पाडण्याचे काम तुझ्या साधनेवर अवलंबून असेल. माझा त्यासाठी आशीर्वाद!’ खरेच सद्गुरूंची फुंकर किती चैतन्यमयी नि स्पंदनशील असते!
आपलं नवंवर्ष संसार (गुढी) पाडव्यापासून सुरू होतं. निमित्त आहे शालिवाहनाने शकांवर विजय मिळवला त्या गौरवशाली प्रसंगाचं. पण शालिवाहनानं स्वतः तयार केलेल्या सैनिकांच्या हजारो मूर्तीत चैतन्यशक्तीची फुंकर मारून ते जिवंत केले नि त्या सैन्यासह शत्रूचा पराभव केला. आपल्या शिवरायांनीही साध्याभोळ्या मावळ्यांत स्वातंत्र्यप्रेमाच्या फुंकरीने चैतन्य निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही फुंकरही किमयागार (जादुभरली) अशीच होती.
लहानपणी आपल्याच पापणीचा केस डोळ्यात गेल्यामुळे कासावीस झालेल्याच्या डोळ्यात प्रेमळ फुंकर मारून आराम दिला होता. जखमेवरची आईची फुंकर तर जीवनदायिनी होतीच, पण चणेफुटाणे किंवा खायची गोळी जर जमिनीवर पडली तर तिच्यावर तीनदा फुंकर मारून ती आकाशातल्या सूर्याला दाखवून पुन्हा खाणं या बालसुलभ प्रकारातली फुंकरही मजेशीर होती.
अता अशी फुंकरही दुर्मीळ झालीय, कारण आईचं वात्सल्य अन् मुलांचं बाल्य दोन्हीही पातळ (डायल्यूट) झालंय. या खंतयुक्त वेदनेवर फुंकर मारायला आजूबाजूला कोणी आहे का? विचार करूया…