फिरत्या जाहिरात फलकांवर पणजी मनपाची कारवाई

0
17

येथील पणजी महानगरपालिकेने शहरातील बेकायदा फिरते जाहिरात फलक ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पणजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागात बेकायदा फिरते जाहिरात फलक लावण्यात येत आहेत.

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक बैठकीत माजी महापौर, विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी शहरातील बेकायदा फिरत्या जाहिरात फलकांचा मुद्दा उपस्थित करून बेकायदा जाहिरात फलकांकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शहरातील विविध भागात फिरते जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. या फिरत्या जाहिरात फलकांना मान्यता घेतली जात नसल्याने पालिकेला कोणताही महसूल मिळत नाही. फिरते जाहिरात फलकांसाठी शुल्क लागू केल्यास महानगरपालिकेला महसूल प्राप्त होऊ शकतो, असे मत नगरसेवक मडकईकर यांनी व्यक्त केले होते.

पणजी महानगरपालिका प्रशासनाने मान्यता न घेता लावण्यात आलेले फिरते जाहिरात फलक ताब्यात कालपासून घेण्यास प्रारंभ केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रमुख ठिकाणी वाहन पार्किंगच्या जागेतही फिरते जाहिरात फलक ठेवले जात होते. दरम्यान, राज्यातील विविध भागात फिरत्या जाहिरात फलकांची संख्या वाढत चालली आहे. पर्वरीला येथे तिसर्‍या मांडवी पुलाखाली फिरते जाहिरात फलक दिसून येत आहेत.