फालेरोंसमोर पक्षसंघटना बळकटीचे आव्हान!

0
122

– गुरुदास सावळ

पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरलेले गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपण ही कठीण जबाबदारी स्वीकारल्याचे फालेरो सांगत आहेत. अर्थात सुभाष शिरोडकर यांनी विधानसभा निवडणूक निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यावर श्री. फालेरो यांना गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाबाबत विचारणा करण्यात आली होती. ईशान्य भारतातील सात राज्यांचा ताबा फालेरो यांच्याकडे होता. या सात राज्यांतील कॉंग्रेसजनांना ते पक्षश्रेष्ठी होते. या राज्यांच्या दौर्‍यावर गेल्यास त्यांच्या दिमतीला हॅलिकॉप्टर असायचे. ईशान्य भारतातील राज्यांत त्यांना मोठा मान होता. सर्व मुख्यमंत्री त्यांना ‘सर’ म्हणून संबोधायचे. त्यामुळे हा मान-सन्मान सोडून गोव्यात येण्याची त्यांची मानसिक तयारी नव्हती. गोव्यातील सर्व कॉंग्रेसनेते त्यांना ‘लुईझिन’ म्हणून संबोधतात. त्याशिवाय कितीही कष्ट केले तरी भाजपच्या सरकारपुढे आपले काही चालणार नाही याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्षपदाचा काटेरी मुकूट स्वीकारण्यास ते राजी नव्हते. कॉंग्रेस श्रेष्ठींनी गोव्यातील अनेक मान्यवर नेत्यांकडे विचारणा केली, मात्र ही जबाबदारी स्वीकारण्यास कोणीच तयार नव्हता. शिवाय प्रत्येक नावाला इतरांचा कट्टर विरोध असायचा. जॉन फर्नांडिस यांना त्वरित हटवा असा आग्रह गोव्यातील बहुसंख्य कॉंग्रेस नेत्यांनी धरल्याने अखेर श्रीमती गांधी यांनी हस्तक्षेप करून फालेरो यांना अध्यक्षपद स्वीकारण्यास भाग पाडले आहे.
लुईझिन फालेरो यांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आपण सर्वाधिक महत्त्व देणार असल्याचे जाहीर केले आहे. नावेली मतदारसंघातून विधानसभेवर बिनविरोध निवडून येण्याची किमया त्यांनी केलेली आहे. १९८४ च्या निवडणुकीत गोवा कॉंग्रेसचे सर्व उमेदवार पराभूत झाले, मात्र लुईझिन फालेरो या एकाच उमेदवाराने नावेलीतून बाजी मारली. या निवडणुकीत गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विली डिसौझा हेही पराभूत झाले होते. अशा या बलाढ्य नेत्याचा २००७ मधील निवडणुकीत गोवा बचाव मंचचे पुढारी चर्चिल आलेमांव यांनी पराभव केला. या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी त्यांना दिल्लीत नेऊन ईशान्य भारतातील सात राज्यांचा प्रभारी केला. मिझो, नागा, मणीपुरी लोकांशी लुईझिन यांची नाळ जुळली आणि त्या राज्यात कॉंग्रेसला चांगले पाठबळ मिळाले. या सात राज्यांतील कॉंग्रेसनेते फालेरो यांची उत्तम काळजी घेत असत.
गोव्यातील एक आलेमांव कुटुंब सोडले तर इतर कॉंग्रेसनेत्यांशी लुईझिन यांचे फार चांगले संबंध आहेत. मात्र गेल्या सात वर्षांत त्यांचे गोव्यातील कॉंग्रेसजनांशी फारसे संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना नव्याने संबंध प्रस्थापित करावे लागणार आहेत. सर्वप्रथम कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना एका छताखाली आणावे लागणार आहे. दाबोळीचे कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो भाजपाच्या एवढे आहारी गेलेले आहेत की त्यांना परत कॉंग्रेसमध्ये आणणे फारच कठीण आहे. माविन अवघड जागी झालेले दुखणे ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांना मनाने स्वगृही आणण्यात फालेरो यांना यश मिळाले तर फालेरो यांच्या नेतृत्वगुणांना दाद द्यावी लागेल. निवडून येण्यासाठी आपल्याला कॉंग्रेस पक्षाची गरजच नाही असे सांताक्रूझचे कॉंग्रेस आमदार बाबुश मोन्सेरात यांनी अनेकवेळा स्पष्टपणे सांगितले आहे. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात काही आपल्या पतीविरुद्ध असणार नाहीत. मोन्सेरात पती-पत्नीचा वेगळाच गट आहे. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर कधी बाबुशबरोबर तर कधी विश्‍वजित राणे यांच्याबरोबर असतात. खाण प्रकरणाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे सध्या मौन पाळणेच पसंत करतील. केपेचे आमदार केरळमधील सुमारे पाच कोटींच्या मालमत्ता प्रकरणात गुंतलेले असल्याने सध्या ते ‘ब्र’ही काढणार नाहीत. वाळपईचे आमदार विश्‍वजित राणेही सध्या राजकारणात विशेष सक्रिय दिसत नाहीत. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या नऊही आमदारांना एका छताखाली आणणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही, याची लुईझिन फालेरो यांना नक्कीच कल्पना असणार.
दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना जॉन फर्नांडिस यांनी पक्षातून निलंबित केलेले आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व गटकॉंग्रेस समित्या बरखास्त करून नवे अध्यक्ष नियुक्त केले होते. लुईझिन फालेरो यांची नवे अध्यक्ष म्हणून ज्या दिवशी घोषणा झाली त्याचवेळी जॉन फर्नांडिस यांनी नव्या गटाध्यक्षांची नियुक्ती केली होती. अर्थात कॉंग्रेसश्रेष्ठींची मान्यता घेऊनच ही नियुक्ती केली होती. आता जॉन फर्नांडिस यांची उचलबांगडी करण्यात आल्याने नव्या गटाध्यक्षांचे काय करायचे याचा विचार आणि निर्णय नव्या प्रदेशाध्यक्षांना घ्यावा लागणार. गटकॉंग्रेस समित्या बरखास्त करणारा आदेश नवे अध्यक्ष मागे घेण्याचीच अधिक शक्यता आहे. नव्याने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्याची घोषणा नूतन अध्यक्षांनी केली आहे. भाजपाने गोव्याचा कानाकोपरा पादाक्रांत केलेला असला तरी एक लाख सदस्य करण्याचे लक्ष्य गाठणे फारसे कठीण नाही. सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यावर गटकॉंग्रेस आणि जिल्हा कॉंग्रेस समित्या निवडाव्या लागतील. त्यामुळे जुन्या समित्या बरखास्त करणारा आदेश लुईझिन फालेरो मागे घेतील असे दिसते. सुभाष फळदेसाई आणि आलेक्स सिक्वेरा यांच्यावरील कारवाईही मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.
चर्चिल आलेमांव आणि वालंका आलेमांव तसेच आलेमांव घराण्याबद्दल फालेरो कोणती भूमिका घेतात यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. फालेरो यांचे जे राजकीय पतन झाले त्याला चर्चिलच जबाबदार आहेत. गोवा बचाव मंच स्थापन करून चर्चिल आलेमांव यांनी नावेलीतून निवडणूक लढविली नसती तर २००७ मधील निवडणुकीत फालेरो नक्कीच विजयी झाले असते. फालेरो असते तर मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली असती. अशा परिस्थितीत चर्चिल आलेमांव यांना परत कॉंग्रेसमध्ये आणण्याचा धूर्त डाव फालेरो खेळणार की काय हे कळत नाही. आपण तृणमूल कॉंग्रेस सोडली असे चर्चिल आलेमांव सांगत असले तरी प्रत्यक्षात ते तृणमूल कॉंग्रेसमध्येच आहेत. चर्चिल आलेमांव यांना कॉंग्रेसमध्ये परत घेण्यात आल्यास तो एक नवा विश्‍वविक्रम ठरेल.
पक्ष स्वच्छ करण्यासाठी आणि पक्षकार्यकर्त्यांना शिस्त लावण्यासाठी जॉन फर्नांडिस यांनी अनेेक ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई केली. कोणत्याही पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शिस्त लावलीच पाहिजे; मात्र ज्या पद्धतीने जॉन फर्नांडिस यांनी शिस्तभंगाची कारवाई केली ते पाहता कॉंग्रेस मजबूत होण्याऐवजी अत्यंत विकलांग झाली होती. भ्रष्टाचार प्रशासनात इतका भिनला आहे की पक्षाचा कोणीही नेता आज धुतल्या तांदळासारखा साफ मिळणार नाही. फर्नांडिस यांनी निलंबित केलेल्या लोकांना परत घेतले तर फालेरो यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना परत घेतले नाही तर पक्ष बळकट होणे कठीण आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक आणि फ्रान्सिस सार्दिन यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. फालेरो या नोटिसी मागे घेतील अशी अपेक्षा आहे.
आपली अकाली हकालपट्टी करण्यामागे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा हात असल्याचा आरोप जॉन फर्नांडिस यांनी केला आहे. पर्रीकरांचे हस्तक कॉंग्रेसमध्ये असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अध्यक्षपदावरून काढून टाकल्याने चिडलेले जॉन फर्नांडिस यांनी रागाच्या भरात केलेल्या या आरोपात काहीच तथ्य नाही. कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चांगले संबंध असले तरी जॉनला काढून टाका असा प्रयत्न पर्रीकर करणार नाहीत. कारण जॉन फर्नांडिस यांनी आपल्या पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना दुखावल्याने त्यांनीच पक्षश्रेष्ठींकडे जॉन हटावची मागणी केली होती हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या तालावर गोव्यातील कॉंग्रेसनेते नाचत असतील तर जॉन फर्नांडिस यांनी त्या पक्षाचा त्याग केला पाहिजे. प्रतापसिंह राणे यांच्याविरुद्ध कॉंग्रेस भवनात भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच दिवशी जॉन फर्नांडिस हटाव मोहिमेला वेग आला हे जगजाहीर आहे. अशा या दुभंगलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संघटित करून कॉंग्रेस संघटना मजबूत करण्याची अत्यंत कठीण कामगिरी फालेरो यांच्या खांद्यावर पडली आहे. ही जबाबदारी ते कितपत पेलतात हे पुढील सहा महिन्यांत स्पष्ट होईल.