>> कामाचे पैसे न दिल्याने खून केल्याची आरोपींची कबुली
चंद्रवाडा, फातोर्डा येथील ठेकेदार मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅटरिना पिंटो या ज्येष्ठांच्या खूनप्रकरणी दादर मुंबई येथे फातोर्ड्याहून पळून गेलेल्या तिन्ही मजुरांना ताब्यात घेऊन काल बुधवारी सकाळी पोलीस गोव्यात पोहोचले. यावेळी वरील दुहेरी खून ठेकेदार मिरांडा यांनी कामगारांना कामाचे पैसे न दिल्याने केल्याचे तिन्ही संशयितांनी कबुल केले. त्यानंतर त्यांना काल प्रथम वर्ग न्यायालयांत सादर केले असता न्यायाधीशांनी पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
दि. ८ रोजी रात्री मिरांडा व कॅटरिना यांचा आकाश घोष (२०, झारखंड), आदित्यकुमार (१८, झारखंड) व रवीनकुमार (१८, बिहार) या तीन मजुरांनी हातोड्याने डोक्यावर प्रहार करून सुर्याने भोसकून खून केला होता. खूनानंतर मृतदेह गोधडीत गुंडाळून तिन्ही मजुरांनी मिरांडा यांची दुचाकी घेऊन वास्को रेल्वे स्थानकावर गेले व तेथून ते आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने मुंबईला गेले होते. तेथून ते झारखंड व बिहार येथे आपल्या मूळ गावी जाणार होते. मात्र तत्पूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
गेल्या वीस दिवसांपासून ते मिंगेल मिरांडा यांच्या घरामागे बांधलेल्या खोलीत भाड्याने राहायचे. मिरांडा बांधकाम व रस्ते बांधकाम ठेकेदार होते. या तिन्ही मजुरांनी त्यांच्याकडे कामाचे पैसे मागितीले होते. मात्र ते पैसे वेळेवर न दिल्याने व मागूनही देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संतापून त्यांनी दोघांचाही खून केला.
काल फातोर्डा पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक पंकजकुमार व पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही संशयितांची सखोल तपासणी सुरू केली आहे.
मुंबई येथील पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंदे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. विदेश प्रभु, पोलीस उपआयुक्त (प्रकरीकरण) प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी. मध्य) नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तासांच्या आत कारवाई केली. फातोर्डा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक तेजसकुमार व पोलीस पथकाने त्यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले.
दादरमध्ये फिरताना अटक
दुहेरी खून प्रकरणातील वरील तिन्ही संशयित आरोपी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना शिवाजी पार्क परिसर दादर पश्चिम मुंबई येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी मळताच त्यांनी तपास पथकाच्या विविध तुकड्या बनविल्या व कसून तपास सुरू केला. आरोपी चैतन्यभूमी जवळील शिवाजी पार्क मध्ये हातात बॅग घेऊन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. मुंबई पोलिसांनी, गोवा पोलिसांनी पाठविलेल्या छायाचित्राच्या आधारे पडताळून पाहिले असता तेच संशयित असल्याचे कळल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.