फातराडे येथे पर्यटकांच्या खोलीत ३.५८ लाखांची चोरी

0
93

काल फातराडे येथील हॉटेलात थांबलेल्या कर्नाटकातील दोन मित्रांच्या खोलीतून चोरट्यांनी ३.५८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बंगलोर येथील स्वामीवाधन पर्यटकाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र, सोनसाखळी, रोख दोन हजार रुपये पळविले तर त्यांचा मित्र सतीश वर्मा, दिल्ली यांच्या खोलीतून दोन कर्णफुले, लॉकेट असे दागिने चोरीला गेले. त्यांनी खोलीत टेबलवर सदर वस्तू ठेवल्या होत्या. चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला व चोरी केली. कोलवा पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.
थिवीत विवाहितेची आत्महत्या
धानवा-थिवी येथील अनिशा अनिल मुळगावकर (३८) या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार काल संध्याकाळी उघडकीस आला. अनिशा हिने आपल्या खोलीत छपराच्या वाशाला नायलॉन दोरी बांधून गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या नजरेस पडताच त्यानी म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सदाशिव हन्सीकुट्टी व सहकारी पोलिसांनी बार्देशचे विभागीय दंडाधिकारी साबाजी शेटये यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला. मयत अनिचा व अनिल यांचा २००८ मध्ये विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी पुढील तपास विभागीय दंडाधिकारी साबाजी शेट्ये करीत आहेत.
गाड्या भाड्याने घेऊन फसवणूकप्रकरणी अटक
करारपत्राद्वारे भाड्याने गाड्या घेऊन त्या परत न करता फसवणूक केल्याच्या आरोपाखालील म्हापसा पोलिसांनी कान्साभाट-थिवी येथील संशयित आरोपी दिलेश दिगंबर चांदेलकर (२९) याला अटक केली आहे. फिर्यादी नारायण शिर्लेकर (अराईसवाडा-नागवा) यांनी स्वत:ची जीए-०३-एच ३१३८ व प्रकाश कळंगुटकर यांची जीए-०३-सी-८७६५ क्रमांकाची महिंद्रा बोलेरो या दोन गाड्या संशयित आरोपीस तीन महिन्यांच्या करारपत्राद्वारे भाड्याने दिल्या होत्या. या करारपत्राची मुदत २६ ऑगस्ट रोजी संपली असतानाही संशयिताने दोन्ही गाड्या परत करण्यास नकार दिला.
फिर्यादीने याप्रकरणी म्हापसा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२० व ४०६ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार दयानंद साळगावकर करीत आहेत.
बलात्कारप्रकरणी संशयिताला जामीन
कुडतरी येथील दीपक धुरी याला बलत्कार प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केली होती. त्याने केलेला जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी सशर्त मंजूर केला. १५ हजार रुपयांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचा एक हमीदार, पाच दिवसांपर्यंत मडगाव पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याचा आदेश दिला. दि. ७ ऑगस्ट रोजी दीपक धुरीविरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदविली होती. तीन वर्षांमागे दीपक एक तरुणीला घेऊन कोलवा रस्त्यावरील हॉटेलात गेला होता व तिच्यावर तेथे बलात्कार केला. त्यावेळी तिचे अश्‍लील फोटो काढून तिला धमकावू लागला.
चिंचोणे हल्लाप्रकरणी संशयितास जामीन
चिंचोणे येथील कर्सन फर्नांडिस हत्येतील संशयित रुपेश रंगनाथ च्यारी याला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी सशर्त जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचा एक हमीदार तसेच आठवडाभर सकाळी १० ते १ वाजेपर्यंत पोलीस स्थानकावर उपस्थिती लावणे, साक्षिदाराला हस्तक्षेप न करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे या अटी घातल्या तर या प्रकणातील अजय रंगनाथ च्यारी व सनीश गुरुनाथ च्यारी (मुळगाव) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज दि. ८ सप्टेंबर रोजी सुनावणीस येणार आहे.
माडेल मडगाव येथील श्रीमती इजलेंट व्हाज हिने आपला भाऊ कर्सन फर्नांडिस यांची हत्या केल्याची तक्रार दिली होती. शिक्रेवाडा चिंचोणे येथील रुपेश च्यारी याला १८ ऑगस्ट रोजी अटक केली. दि. २८एप्रिल २०१४ रात्री १०.३० वा. चिंचोणे बाजारातील जुन्या कोमुनिदाद बिल्डींगजवळ अजय रंगनाथ च्यारी व ऑम्लेट गाडेवाला कर्सन फर्नांडिस यांच्यामध्ये ऑम्लेटवरूनक वाद झाला. कर्सन याला मारहाण करून रस्त्यावर फेकून दिले होते. त्यात तो मरण पावला.
नोकरीचे आमिष दाखवून गंडा; तरुणाला अटक
गोव्यात सरकारी नोकरी देतो असे आमिष दाखवून कित्येकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या कुडतरी येथील प्रथमेश ऊर्फ रुपेश प्रसाद सावंत (३३) या तरुणाला अटक केली. तर त्याचा साथीदार रुपेश शेटकर, केपे हा फरारी आहे. रिवण येथील कैलास उपसकर याने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. डिसेंबर २०१२ मध्ये कैलासकडून सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून दहा लाख रुपये घेतले होते. सावंतसोबत आणखी एक तरूण व एक महिला अशी ही टोळी असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
दरोडा प्रकरणातील संशयितांना कोठडी
कळंगुट पोलिसांनी गुरूवारी श्रीधर मूर्ती (२१, कर्नाटक) व राहुल पटेल (२४, उत्तर प्रदेश) या दोघांना सापळा रचून बागा-कळंगुट येथे अटक केली होती. त्यांना म्हापसा न्यायालयासमोर काल हजर केले असता त्यांना सात दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली. त्यांचे अन्य साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. मुंबईतील चार पर्यटकांना मारहाण करून त्यांच्याकडील २.७५ लाखांचा ऐवज लुटला होता.