- – ज. अ. रेडकर
व्यवसायात माऊथ पब्लिसिटी फार परिणामकारक असते. तुम्ही चांगले व प्रामाणिक काम करीत असाल तर त्याची कीर्ती वार्याबरोबर दरवळत जाते आणि लोक तुम्हाला शोधीत येतात. उलट तुम्ही अप्रामाणिक आहात असे लोकांना कळले की ग्राहक तुमच्यापासून दूर जातात.
फसवाफसवी हा आधुनिक जगताचा शाश्वत धर्म झाला आहे. अर्थात पूर्वी फसवाफसवी किंवा लबाडी नव्हती अशातला भाग नाही. शकुनी मामाने जरासंधाच्या अस्थीपासून बनविलेले फासे वापरून पांडवांना लबाडीने द्यूतात हरविले होते. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला होता अशा कथा महाभारतात वाचायला मिळतात. ही त्यावेळची लबाडी म्हणजे फसवाफसवीच होती. म्हणजेच लबाडी किंवा फसवाफसवीचा इतिहास फार पुरातन आहे. मात्र संगणकयुग आल्यापासून फसवाफसवीत प्रचंड वाढ झालेली दिसते.
तुमच्या भ्रमणध्वनीवर एखादा कॉल येतो. त्यावर एखाद्या ललनेच्या मधुर आवाजात तुम्हाला लॉटरी लागल्याची गोड बातमी दिली जाते किंवा तुम्हाला बँकेने नवीन क्रेडिट कार्ड पाठविल्याचे सांगितले जाते व तुमचा बँक अकौंट नंबर विचारला जातो. तुम्ही दिलेली माहिती खरी आहे याची पडताळणी करण्यासाठी आधार कार्डचा नंबर विचारला जातो. पुढे काही रक्कम भरण्याचा आग्रह होतो आणि भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी विचारला जातो. अशी माहिती तुम्ही एकदा दिली की पुढच्याच क्षणाला तुमचा बँक बॅलन्स झिरो झालाच म्हणून समजा!
ज्या क्रमांकावरून तुम्हाला फोन आला असेल तो नंबर पुन्हा संपर्कात येत नाही. याला सायबर क्राईम असे म्हटले जाते. म्हणूनच अशा फोनकॉलपासून किंवा मिळालेल्या संदेशांपासून आपण सावध राहायला पाहिजे आणि आपली कोणतीही व्यक्तिगत माहिती किंवा बँक अकौंटविषयीची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. बँक आपल्या ग्राहकांना याबाबतीत वेळोवेळी सूचना देत असते. पोलीस खातेदेखील सावध करीत असते. तरीदेखील काही लोक केवळ लोभापायी या भामट्यांच्या जाळ्यात अडकतात आणि नंतर पस्तावतात. मध्यंतरी गुंतवणुकीतून २० ते २५ टक्के व्याज मिळण्याचे किंवा अल्पावधीत रक्कम दुप्पट होण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली. परदेशी नोकरी देतो म्हणून सांगूनदेखील अनेकांना लाखो रुपयांना गंडवले गेले. आपण गंडवले गेलो आहोत हे कळेपर्यंत भामटा दूर पोहोचलेला असतो. बरेच अथक प्रयत्न करून पोलिसांनी त्याला पकडले तरी त्याच्याकडून आपली ठकवलेली रक्कम परत मिळेल याची शाश्वती नसते. फार तर फसवणार्याला ४२० कलमाखाली अटक होते, दीर्घकाळ कोर्ट-कचेर्या होतात आणि त्या लबाड लांडग्याला काही महिन्यांची शिक्षा होऊन तो सुटतो. आपले आर्थिक नुकसान तर होतेच आणि वर मानसिक स्वास्थ्यही बिघडते. दिल्ली चिट फंड, पश्चिम बंगाल चिट फंड ही एकेकाळी गाजलेली प्रकरणे तशाच प्रकारची आहेत. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे हाच त्यावर उपाय होय!
दैनंदिन व्यवहारातदेखील आपण फसवले जात असतो. बर्याचदा आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आपणाला फसविले जाते. अगदी मनगटी घड्याळासारख्या मामुली वस्तूच्या दुरुस्तीपासून ते टीव्हीपर्यंतच्या दुरुस्तीपर्यंत आणि दुचाकीच्या दुरुस्तीपासून चारचाकी वाहनाच्या दुरुस्तीपर्यंत सर्वत्र आपली फसवणूक होत असते. कारण त्यातील गम्य आपणाला नसते. या विषयातील आपले अज्ञान पाहूनच दुरुस्तीचा खर्च सांगितला जातो आणि आपण तो मुकाट्याने सहन करतो. कारण अन्य इलाज नसतो. आपले अज्ञान आणि आपली असहायता याचा गैरफायदा अशावेळी घेतला जातो. सध्या सर्व उपकरणांत इलेक्ट्रॉनिक्स पूर्जे वापरले जातात. त्यांची किंमत तशी कमी असते, मात्र आपल्याला ती माहीत नसल्याने सदर उपकरणे दुरुस्त करणारा जी किंमत सांगेल ती द्यावी लागते. ऑनलाइन अशी उपकरणे मागवण्याचा कलही समाजात आज वाढत आहे. परंतु इथेही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरे, अशा वस्तू खराब निघाल्यास त्या बदलून मिळतील याची शाश्वती नसते. कधी कधी त्यासाठी यातायात करावी लागते. सर्वांनाच ती जमते अशातला भाग नाही.
व्यवसायात आता पारदर्शकता राहिलेली नाही; मग तो कोणताही व्यवसाय असो. अगदी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. माझ्या एका नवोदित साहित्यिक मित्राला याचा कटू अनुभव आला. कोणत्याही उदयोन्मुख कवी किंवा लेखकाला आपले साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित व्हावे असे वाटत असते. अशा नवोदिताला हेरून काही स्थानिक प्रकाशक त्याचा बकरा बनवतात. जे पुस्तक पंधरा-वीस हजारात छापून होते ते दुप्पट किमतीला त्याच्या गळ्यात मारले जाते. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे त्या व्यक्तीला कालांतराने समजते तेव्हा त्याच्या मनातून तो प्रकाशक उतरून जातो आणि कधीही त्याच्याकडे पुन्हा जात नाही. ज्याची फसवणूक झालेली असते तो इतरांना या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. म्हणजेच जो फसवतो त्याचे नंतर नुकसानच होत असते. व्यवसायात तोंडातोंडी झालेली प्रसिद्धी (माऊथ पब्लिसिटी) फार परिणामकारक असते. तुम्ही चांगले व प्रामाणिक काम करीत असाल तर त्याची कीर्ती वार्याबरोबर दरवळत जाते आणि लोक तुम्हाला शोधीत येतात. उलट तुम्ही अप्रामाणिक आहात असे लोकांना कळले की ग्राहक तुमच्यापासून दूर जातात.
अशा फसवाफसवीतून तात्कालिक फायदा होत असला तरी दीर्घकालीन तोटाच होतो. काहीवेळा नियती याचा सूड उगवते. आपण कुणाला दहा रुपयांना नागवले तर आपले पुढे शंभर रुपयांचे नुकसान होणारे असते. आस्थापनांना, दुकानांना, कारखान्यांना आगी लागल्याचे किंवा दरोडा पडल्याचे आपण बातम्यांतून वाचतो/पाहतो. यामागेदेखील ग्राहकांची केलेली फसवणूक हेच कारण असू शकेल असे मला वाटते. म्हणूनच थोडा नफा झाला तरी चालेल पण दुसरा नागवला जाणार नाही याची काळजी घेतली तर किती छान होईल नाही का?