नागझर-कुर्टी येथील भिवा मडसो गावस या व्यक्तीची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका दाम्पत्यास काल अटक केली. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी विजयनाथ केळुराव गावडे व त्याची पत्नी विदिशा गावडे (रा. पोस्तवाडा – होंडा) यांना अटक केली. गोमेकॉत कर्मचारी असलेला विजयनाथ गावडे हा आपल्या पत्नीच्या मदतीने जागा विक्री करण्याचे आमिष दाखवून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार भिवा गावस यांनी जागा खरेदीसाठी इच्छा दर्शविली होती. त्यानुसार सदर दाम्पत्याने गावस यांच्याकडून 10 लाख रुपये रोख घेतले होते; परंतु सदर दाम्पत्य जागा दाखवत नसल्याने भिवा गावस यांनी पैसे परत करण्याची मागणी केली होती; परंतु रक्कम परत दिली जात नसल्यने त्यांनी मंगळवारी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर फोंडा पोलिसांनी सदर दाम्पत्यास अटक केली.