फसवणूक न होणारे गुंतवणुकीचे पर्याय

0
1037

– शशांक मो. गुळगुळे

प्रत्येक माणूस वयोपरत्वे वेगवेगळ्या कारणांसाठी गुंतवणूक करतो. कोण घर घेण्यासाठी, कोण मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, कोण मुलींच्या लग्नासाठी तर काहीजण सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी गुंतवणूक करतात. आपल्या उत्पन्नातून खर्च झाल्यानंतर उरलेली काही रक्कम गुंतवणूक करणे हे केव्हाही चांगले. पण ती गुंतवणूक डोळस हवी. शारदा चिट फंड, सहारा वगैरेंसारख्यांकडे मात्र गुंतवणूक करू नये. गुंतवणुकीसाठी कोणते फसवणूक न होणारे, जोखीम कमी असलेले गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत त्यांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. मार्च २०१५ मध्ये चालू आर्थिक वर्ष संपेल. आयकरातून सवलत मिळण्यासाठी आयकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या बर्‍याच जणांचे यासाठीच्या गुंतवणुकीचेही नियोजन चालू असेल. गुंतवणूक योजनेबाबत पूर्ण माहिती मिळेपर्यंत व सदर योजनेबाबत स्वतःचे पूर्ण समाधान होईपर्यंत गुंतवणूक करू नये. उगाच जास्त परतावा मिळेल या आशेने कुठेही गुंतवणूक करू नये. ‘मार्केट मेकॅनिझम’नुसार जेवढा परतावा मिळणे शक्य आहे तेवढाच मिळणार. गुंतवणुकीत जोखीम किती हेही पूर्णपणे जाणून घ्यावे. लहान वयात गुंतवणुकीला सुरुवात करणे हे केव्हाही चांगले. यामुळे आपली फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊ शकते.
शेअर व शेअरमध्ये गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक : शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून तुम्ही चलनवाढीवर मात करू शकता. गेल्या १० वर्षांत शेअरबाजारातील गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी १५ टक्के दराने तर निफ्टीमधील गुंतवणुकीवर १६ टक्के दराने परतावा मिळाला आहे, तर भारतातील चलनवाढीचा दर सरासरी ७ टक्के आहे. शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जुगार ही पुरातन समजूत गुंतवणूकदारांच्या मनातून गेली असून आता शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या गुंतवणूकदारांना जर शेअरबाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल तर त्यांनी म्युच्युअल फंडांच्या योजनांत गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडाकडे जमा होणारा निधी कुठे व किती गुंतवायचा याचा निर्णय या विषयातील तज्ज्ञ घेतात. त्यामुळे सामान्यांसाठी म्युच्युअल फंडाचा मार्गच योग्य असतो. गुंतवणूकदारांना जर जास्त जोखीम घ्यावयाची नसेल तर म्युच्युअल फंडांच्या सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेन्ट्‌स प्लान्समध्ये (एसआयपी) गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीतून कालांतराने तुम्ही चांगला निधी जमवू शकाल.
सोने व घर यांच्यात गुंतवणूक : भारतीयांना सोने विकत घेण्यासाठी किंवा सोन्याचे दागिने बनवून घेण्यासाठी कोणाची शिफारस लागत नाही. सोन्यात पैसे अडकविणे ही भारतीयांची जन्मजात आवड आहे. सोन्यातील गुंतवणुकीतूनही मिळणारा परतावा चलनवाढीच्या दरावर मात करू शकतो. एखाद्याकडे गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम उपलब्ध असेल तर घर खरेदीत गुंतवणूक केव्हाही चांगली. पण तुम्हाला जर तातडीने पैशाची गरज लागली तर तुम्हाला ज्या दराने घर विकायचे त्या दराने विकत घ्यायला तात्काळ ग्राहक मिळेलच असे सांगता येणार नाही. सोन्यात गुंतवणुकीचे आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यात तुम्हाला ‘फिजिकल फॉर्म’मध्ये सोने बाळगावे लागत नाही. सोन्याचे वजन नमूद केलेली सर्टिफिकेट्‌स स्वतःकडे बाळगता येतात. घरात गुंतवणूक करून कालांतराने भाव वाढल्यामुळे जर घर विकायचे ठरविले तर यातून आलेला पैसा हा पुन्हा घरातच गुंतवावा लागतो, नाहीतर कॅपिटलगेन्स कर भरावा लागतो. त्यापेक्षा जागा घेऊन ‘लिव्ह ऍण्ड लायन्स’ने ती कोणाला तरी वापरायला देणे यात मात्र फायदा असतो.
पेन्शन प्लॅन: ‘पेन्शन घ्या, टेन्शन घालवा’ ही जी म्हण आहे ती खरोखरच रास्त आहे. काही काही कंपन्यांत, विशेषतः सरकारी खात्यांत कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला निश्‍चित रक्कम पेन्शन म्हणून मिळते. पण ही सोय सर्व कर्मचार्‍यांच्या बाबतीत उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी लागते.
नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) – ही योजना ऐच्छिक आहे. यात नोकरी असताना पद्धतशीरपणे बचत करता येते. या योजनेमुळे गुंतवणूकदारांच्या मनात बचतीची आवड निर्माण होऊ शकते. भारतातील प्रत्येक नागरिकाला सेवानिवृत्तीनंतर निश्‍चित पुरेसे उत्पन्न मिळावे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते. यात खाते उघडणार्‍यांना ‘परमनन्ट रिटायरमेन्ट अकाऊंट नंबर’ देण्यात येतो आणि हा नंबर या योजनेत व्यवहार करताना जिवंत असेपर्यंत सातत्याने वापरावा लागतो. यातील टियर-१ अकाऊंटमध्ये मध्ये पैसे काढता येत नाहीत. मुदतपूर्तीनंतरच पेन्शन मिळते. टियर- २ अकाऊंटमध्ये मध्ये पैसे काढता येतात. एनपीएमचे व्यवहार पाहण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे.
इन्फ्लेशन इंडेक्सेड बॉण्डस् : चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त दराने परतावा देणारी ही गुंतवणूक योजना आहे.
भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) : या योजनेत सध्याच्या केंद्र सरकारने नुकतेच काही बदल केले आहेत. हा निधी कंपनीचा मालक कर्मचार्‍यांच्या पगारातून कापून घेतो व तितकीच रक्कम आपणही घालतो. कर्मचारी भविष्य निधी योजनेतील प्रत्येक कर्मचार्‍याला ३ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आहे. बहुतेक सर्वांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन या पी.एफ.वरच अवलंबून असते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पी.पी.एफ.) : ही संपूर्णतः करमुक्त योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज पूर्णतः करमुक्त आहे. यात दरवर्षी कमाल दीड लाख रुपये गुंतवणूक करता येऊ शकते. या खात्याची मुदत १५ वर्षे आहे. पण १५ वर्षांनंतर पाच-पाच वर्षांसाठी असे एकूण तीन वेळा नुतनीकरण करता येते. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर ८.७ टक्के दराने व्याज मिळत आहे. आयकरात सवलत मिळविण्यासाठी ही गुंतवणूक योजना चांगली आहे. खाते उघडल्यानंतर ७ वर्षांनी, अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस असलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम काढता येऊ शकते. तीन वर्षानंतर या योजनेतून कर्जही मिळण्याची सोय आहे. कर्जावर १०.७ टक्के दराने व्याज आकारले जाते. या योजनेत किमान गुंतवणूक ५०० रुपये आहे. प्रत्येक माणूस एकच पी.पी.एफ. खाते उघडू शकतो. हे खाते संयुक्तपणे उघडता येत नाही. या खात्यातून तुम्ही एका आर्थिक वर्षात बाराहून अधिक वेळा गुंतवणूक करू शकत नाही. पोस्ट कार्यालये, स्टेट बँक ऑफ इंडिया, काही सार्वजनिक उद्योगातील बँकांच्या काही शाखा व आयसीआयसीआय बँकेच्या काही शाखा येथे हे खाते उघडता येते. एखाद्या आर्थिक वर्षात तुम्ही खात्यात काहीही रक्कम जमा केली नाही तर तुमचे खाते ‘इनऍक्टिव्ह’ होते व नंतर तुम्हाला ५० रुपये दंड भरून ते पुन्हा ‘ऍक्टिव्ह’ करून घ्यावे लागते. अनिवासी भारतीयांना हे खाते उघडता येत नाही. खातेदाराच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसाला जमलेली रक्कम व्याजासकट परत देण्यात येते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे : एनएससी- ८ इश्यू यात ५ वर्षांनंतर मुदतपूर्ती होते, तर एनएससी- ९ इश्यू यात १० वर्षांनंतर मुदतपूर्ती होते. ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर ८.५ टक्के दराने तर १० वर्षांच्या गुंतवणुकीवर ८.८ टक्के दराने व्याज मिळते. यावर मिळणारे व्याज आयकर सवलतीस पात्र नाही. यात किमान १०० रुपये गुंतवणूक करावी लागते. कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. ही सर्टिफिकेट्‌स १०० रुपये, ५०० रुपये, हजार रुपये, ५ हजार रुपये व १० हजार रुपये अशा मूल्यांची उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार कोणत्याही रकमेची कितीही सर्टिफिकेट्‌स विकत घेऊ शकतो.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना : यातील गुंतवणुकीवर सध्या ८.४ टक्के दराने व्याज मिळत आहे. हे व्याज दर महिन्याला मिळते म्हणूनच या योजनेचे नाव ‘मासिक उत्पन्न योजना’ असे आहे. ज्या तारखेला हे खाते उघडेल त्या तारखेला दर महिन्याला व्याज मिळते. एकाच्या नावे खाते असेल तर किमान १५०० रुपये व कमाल साडेचार लाख रुपये गुंतवणूक करता येऊ शकते. संयुक्त खाते असेल तर ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षे आहे. सेवानिवृत्तांसाठी ही योजना फार चांगली आहे.
कंपन्यांच्या मुदतठेवी व कर्जरोखे : कंपन्यांच्या ठेवींत ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करता येते व यावर ठरवून दिलेले व्याज मिळते. वित्तीय संस्था व नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या प्रामुख्याने या ठेवी स्वीकारतात. या गुंतवणुकीवर तुम्हाला जास्त व्याज मिळू शकते, पण ही गुंतवणूक सुरक्षित नसून बँकांच्या ठेवींत केलेली गुंतवणूक ही जास्त सुरक्षित व कमी जोखमीची असते. पण चांगल्या कंपन्यांच्या ठेवींत गुंतवणूक करणार्‍यांना आतापर्यंत चांगला परतावा मिळाला आहे. यात मिळणारे वार्षिक व्याज जर ५ हजार रुपयांहून कमी असेल तर मूलस्रोत आयकर कापला जात नाही. ‘एएए’ रेटिंग असलेल्या कंपन्यांच्या कर्जरोख्यांतही गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्‌स : हे दीर्घमुदतीचे असतात. यातून जमणारा निधी शासनाचे पायाभूत गरजांचे प्रकल्प उभारण्यासाठी वापरला जातो. यावर ८ ते १० टक्के दराने व्याज मिळते.