काशीमठ येथील फर्मागुढी-ढवळी चौपदरी रस्त्यावरून क्रेन उंचावरून खाली कोसळल्याने एकजण जागीच ठार झाला. या अपघातात आणखी एक गंभीर जखमी झाला आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. क्रेन सुमारे आठ मीटर उंचावरून खाली जोडरस्त्यावर कोसळल्याने डोक्याल गंभीर इजा झाल्याने क्रेनचालक पप्पूकुमार रामेश्वर यादव (वय २३) हा ठार झाला.
क्रेनवरील दुसरा कामगार अर्जुन बिंदेश्वर यादव हा गंभीर जखमी झाला असून, ते दोघेही बिहार राज्यातील आहेत. जखमीला बांबोळी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चौपदरी रस्त्यावरील खांबांवर पथदीप घालण्याचे काम हे कामगार करीत होते. ते दोघेही फोंडा भागात भाड्याच्या खोलीत राहत होते.
अपघातग्रस्त क्रेन सकाळी फर्मागुडी फोंडा येथून ढवळी मार्गे खांब्याना दिवे घालण्याच्या कामासाठी जाताना काशीमठ येथील उतरणीवर पोचली असता क्रेनचालकाचा ताबा गेल्याने ही क्रेन थेट आठ मिटर उंचीवरून खाली जोडरस्त्यावर कोसळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातावेळी जोडरस्त्यावर एकही वाहन नव्हते, अन्यथा आणखी जीवितहानी झाली असती. क्रेनवरील कामगार अर्जून यादव याने क्रेन कोसळताना उडी मारल्याने तो बचावला, मात्र तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर लगतच्या लोकांनी धाव घेतली. जोडरस्त्यावरून येणार्या वाहनचालकांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला. फोंडा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन जखमीला आधी फोंडा आयडी इस्पितळ व नंतर बांबोळी इस्पितळात पाठवले. या रस्त्यावरील वळणावर क्रेनचा तोल गेला आणि ब्रेक न लागल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला.
सरकारला जाग यावी
म्हणून आज निदर्शने
बांदोडा तसेच लगतच्या फोंडा भागातील काही जागृत नागरिक आज (गुरुवारी) सकाळी साडेनऊ वाजता काशीमठ येथे निषेध करणार आहेत. या चौपदरी रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याने सरकारला जाग यावी, यासाठी नागरिक निदर्शने करणार आहेत.