>> जखमीवर गोमेकॉत उपचार
फर्मागुडी येथे काल दुपारी १ वा. सुमारास ११वीच्या विद्यार्थ्यांने १२वीच्या वर्गात शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पोटात सुरा खुपसल्याने १२वीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. संशयिताने विद्यार्थ्याच्या पोटावर दोनवेळा सुरीने वार केले असून जखमी विद्यार्थ्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार दोघेही विद्यार्थी अल्पवयीन असून एका उच्च माध्यमिक हायस्कूलात शिकत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी ११वीच्या विद्यार्थ्यांने बस स्थानकावर मित्रांसमवेत असलेल्या १२वीच्या विद्यार्थ्याच्या पोटात सुरा खुपसला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांनी एका दुचाकीने एका खासगी इस्पितळात नेले. मात्र, पोलीस प्रकरण असल्याने खासगी इस्पितळाच्या डॉक्टरांनी जखमीला उपजिल्हा इस्पितळात पाठविले. सध्या जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
पोलिसानी अल्पवयीन संशयिताची चौकशी करून त्याची रवानगी मेरशी येथील अपना घरात केली आहे. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक नीलेश धायगोडकर यांच्याकडे फोंडा स्थानकाचा अतिरिक्त ताबा असल्याने याप्रकरणी ते तपास करीत आहेत.