फर्मागुडीतील किल्ला नूतनीकरण, संग्रहालयासाठी 97 कोटींचा निधी

0
4

>> केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून गोव्याच्या पर्यटन विकासासाठी निधीला मंजुरी

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने फर्मागुडी-फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज किल्ला नूतनीकरण आणि शिवरायांवर आधारित डिजिटल संग्रहालयासाठी 97.47 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्वरी येथे टाऊन स्क्वेअर प्रकल्पासाठी 90.74 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे नूतनीकरण करण्याची घोषणा राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षापासून केली जात होती. तथापि, नूतनीकरणाचे काम मार्गी लागत नव्हते. अखेर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून फर्मागुडी येथील शिवरायांचा किल्ला आणि डिजिटल संग्रहालयासाठी 97.47 कोटी रुपयांचा मंजूर केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालयासह विद्यमान किल्ल्याचा विकास आणि नूतनीकरण हे पर्यटन उद्योगाच्या वाढीस हातभार लावेल आणि किल्ल्याच्या सौंदर्यात भर टाकेल, असे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.

संग्रहालयामध्ये ऑगमेंटेड रिॲलिटी रूम, होलोग्राम, व्हर्च्युअल रिॲलिटी डिस्प्ले, 5 डी थिएटर आणि परस्परसंवादी प्रदर्शने यासारखी प्रमुख आकर्षणे असतील. इतर वैशिष्ट्‌‍यांमध्ये युद्ध वेशभूषा गॅलरी, बोट गॅलरी आणि सप्तकोटेश्वर स्तंभाची प्रतिकृती समाविष्ट आहे. अतिरिक्त पायाभूत सुविधांमध्ये योग मंडप, घोड्यांची पायवाट, लाईट अँड साउंड शो यांचा समावेश आहे. या प्रकल्पात सण आणि कार्यक्रमांसाठी प्रवेशयोग्यता रॅम्प, पार्किंगची जागा देखील ठेवली जाणार आहे.