![INDIA-WEATHER-FANI-CYCLONE](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/05/3Fani-Cyclone.jpg)
>> १२ लाख नागरिकांचे स्थलांतर : ८ ठार
ओडिशातील पुरीच्या किनारपट्टीवर काल धडकलेल्या फनी वादळाने ओडिशात हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे येथील घरे, वृक्ष जमीनदोस्त झाली असून अनेक भाग जलमय झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला असून १६० जण जखमी झाले आहेत. या शिवाय फनीच्या तडाख्यात सापडलेल्या १२ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गेल्या तीन दशकातील ओडिशामधील हे सर्वात मोठे वादळ असून या वादळामुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर फनी पश्चिम बंगालमध्ये धडकले असून धुवांधार पाऊस सुरू झाला आहे. कोलकाता व हल्दिया विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
‘फनी’चा गोव्याला धोका नाही
‘फनी’ वादळापासून गोव्याला कोणताही धोका नसल्याचे पणजी हवामान खात्याचे स्पष्ट केले आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेले हे वादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची कोणतीही शक्यता नसल्याने या वादळापासून गोव्याला धोका नसल्याचे पणजी हवामान खात्याचे संचालक कृष्णमूर्ती यांनी सांगितले. फनी वादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता नसल्याचे भारतीय हवामान खात्याने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचे कृष्णमूर्ती म्हणाले.